Breaking

Friday, June 17, 2022

मधुमेह नियंत्रणात ठेवताना आहार कसा असावा? https://ift.tt/YKJaZDq

अलीकडेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रकाशित केल्या आहेत. भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत असताना आणि वय खाली येत असताना, हे मार्गदर्शन महत्त्वाचे; तसेच निरामय जीवनासाठी आवश्यक आहे. डॉ. नितीन पाटणकर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, म्हणजे आयसीएमआरने 'टाइप-१' मधुमेहाबद्दल मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर केल्या. मधुमेहींना करोनाची लागण जास्त झाली. मृतांचे प्रमाणही त्यांच्यात जास्त होते. आज मधुमेहींच्या संख्येमध्ये भारत हा जगातील क्रमांक दोनचा देश आहे. गेल्या तीन दशकांत, मधुमेहींच्या संख्येत १५० टक्के वाढ झाली. आयसीएमआरने पहिल्यांदाच देशात मधुमेही किती असावेत, यावर शोधनिबंध प्रकाशित केला. त्यात काही धक्कादायक बाबी दिसल्या. प्री-डायबेटिस असलेल्या लोकांची प्रचंड संख्या, ग्रामीण व शहरी भागातील मधुमेहींमधील फरक कमी होत आहे आणि त्याचे निदान होण्याचे वय कमी होत आहे. पूर्वी पन्नाशीनंतर उगवणारा रोग आता अनेकदा पंचविशीत दिसतो. जगभरात दहा लाख मुले मधुमेही आहेत. त्यांना 'टाइप-१' प्रकारचा मधुमेह आहे. जागतिक मधुमेह फेडरेशनच्या पाहणीनुसार, भारतात 'टाइप-१' मधुमेही मुलांची संख्या जगात सर्वांत जास्त आहे. आपल्या देशात 'टाइप-२', म्हणजे मोठ्या माणसांचा मधुमेह खूप जास्त आहे; पण लहान मुलांचा मधुमेह क्वचित दिसतो असा समज होता. तो चूक निघाला. 'टाइप-२' मधुमेह आता आपण स्वीकारला आहे; पण ज्या मुलांना 'टाइप-१' मधुमेह आहे, त्यांना झालेला आजार हा कलंक नसून, निदान होऊन उपचार करण्यासारखा आहे, हे मानाने आणि समाजाने अजून समाजाने स्वीकारलेले नाही. त्यांच्यासाठी खाणे, पिणे, वावरणे आणि समाजात मिसळणे हे अजूनही एक आव्हान असते. लग्न आणि सोयरिक जमविताना 'टाइप-१' मधुमेह हा अजूनही मोठा अडसर आहे. या पार्श्वभूमीवर, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना भविष्यासाठी पथदर्शक आहेत. 'टाइप-१' मधुमेह म्हणजे, 'दुर्दैवाने इन्सुलिनशिवाय जगू न शकणारी बिचारी मुले,' ही प्रतिमा बदलून, 'एका आव्हानाचा सामना करणारी भावी पिढी' अशी प्रतिमा निर्माण व्हायला याने मदत होईल. या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच, खास करून मधुमेही मुलांना, त्यांच्या पालकांना आणि डॉक्टरांना मधुमेहाकडे पुन्हा नवीन दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली आहे. आयसीएमआरने १७६ पानी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यातील सर्व प्रकरणे 'टाइप-१'च्या विविध अंगांविषयी मार्गदर्शन करतात. मधुमेहाचे निदान अजूनही 'अमेरिकन डायबेटिक असोसिएशन'च्या मार्गदर्शक सूत्रानुसार होत असले, तरी तो कसा हाताळायचा, उपचार काय व कसे करायचे हे आपल्या देशाची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून यात लिहिले आहे. 'टाइप-१' मधुमेह म्हणजे काय? - तो आपल्या गुणसूत्रातील बदलांमुळे होतो. - निदान होण्याचे वय हे १० वर्षांच्या आसपास असते. - इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्सवर हल्ला करणाऱ्या अँटी बॉडीज (प्रतिपिंडे) तयार झालेली असतात. जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेहाचे दोन-तीन नवीन प्रकार नमूद केले आहेत. हळूहळू वाढत जाणारा, अगदी २० ते २४ वर्षे वय झाल्यावर निदान होणारा. यात बीटा सेल्सवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडी सौम्य असतात. संथगामी केटोसिस होण्याची शक्यता आहे, असा 'टाइप-२'चा मधुमेह. बहुतेकदा इन्सुलिन तयार न झाल्याने रक्तातील साखर वाढते, शरीरातील चरबी ऊर्जेसाठी अर्धवट जाळली जाऊन, त्यातून केटोन्स नावाचे पदार्थ तयार झाल्याने रक्तातील आम्लता वाढून, पेशींना ऑक्सिजन मिळेनासा होतो आणि रुग्णाच्या प्राणावर बेतते. याला 'डायबेटिक केटो असिडोसिस' म्हणतात. हा प्रकार बहुतेकदा 'टाइप-१' प्रकारात होतो. नवीन पाहणीनुसार काही 'टाइप-२' मधुमेहात हे होऊ शकते. यालाच 'केटोसिस प्रोन टाइप' म्हणतात. तिसऱ्या प्रकारात, लक्षणे आणि चाचण्यांतून हा मधुमेह कोणत्या प्रकारातील आहे, हे नक्की ठरवता येत नाही. याला तात्पुरते नाव दिले जाते, अगम्य मधुमेह - 'अनक्लासिफाइड डायबेटिस'. 'टाइप-१'चे निदान लहान वयात होते. या मुलांचे वजन अनेकदा कमी असते. याचे निदान अचानक लक्षणांनी होते. ऑटो इम्युनिटी, म्हणजे बीटा सेल्सविरोधी अँटीबॉडी मोठ्या प्रमाणात सापडतात. केटोसिस होण्याची शक्यता खूप जास्त असते किंवा केटोसिसमुळे निदान होते. निदान झाल्यापासूनच इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागते. इन्सुलिनच्या परिणामांना प्रतिरोध नसतो. याउलट संथगामी 'टाइप-१'मध्ये निदान व्हायला तिशी-पस्तिशी उजाडते. वजन बहुधा जास्त असते. निदान होण्यापूर्वी काही अचानक येणारी लक्षणे नसतात. ऑटो इम्युनिटी, म्हणजे बीटा सेल्सविरोधी अँटीबॉडी अगदी कमी प्रमाणात सापडतात. केटोसिस क्वचित होतो. इन्सुलिनवरचे अवलंबन निदान झाल्यापासून सहा महिन्यानंतर येते. 'टाइप-१' मध्ये आहाराकडे लक्ष द्यायला हवे. आहारातून काय साधायचे असते? १. साखरेची पातळी सामान्य असावी. साखर कमी होऊन त्याचे त्रास नसावेत. २. रक्तदाब, वजन आणि कोलेस्टेरॉल हे वयानुरूप सामान्य पातळीत असावेत. ३. 'टाइप-१' असला, तरी मुलांची वाढ उत्तम व्हावी. ४. रक्तवाहिन्यांमध्ये हानिकारक बदल होऊच नयेत, म्हणून काळजी घेणे. ५. स्थळ, काल आणि वैयक्तिक, कौटुंबिक, धार्मिक, सांस्कृतिक बाबी लक्षात घेत आहाराचे नियोजन. ६. एकूण स्वाथ्य टिकवून आहाराबद्दल शिक्षण. 'टाइप-१' मधुमेहासाठी, आयसीएमआरने आहाराविषयी केलेल्या सूचना सर्वांसाठी उपयोगी ठरणाऱ्या आहेत. १. कर्बोदकांपासून मिळणाऱ्या कॅलरी ५०-५५ टक्के. २. यातील साखरेतून मिळणाऱ्या कॅलरी १० टक्क्यांपेक्षा कमी. ३. स्निग्ध पदार्थांतून मिळणाऱ्या कॅलरी २५-३० टक्के. ४. संपृक्त फॅटपासून मिळणाऱ्या कॅलरी १० टक्क्यांपेक्षा कमी. ५. ट्रान्स फॅट कमीत कमी किंवा पूर्णपणे वर्ज्य. ६. बहू असंपृक्त फॅटमधून मिळणाऱ्या कॅलरी १० टक्के. ७. एकल असंपृक्त फॅटमधून मिळणाऱ्या कॅलरी १०-२० टक्के. ८. प्रथिनांमधून मिळणाऱ्या कॅलरी १५-२० टक्के. आहारात तंतूमय पदार्थ असावेत, हे सगळ्यांना माहीत असते; पण मुले भाज्या खात नाहीत. 'टाइप-१'मध्ये किती फायबर पोटात जावे, याविषयी मार्गदर्शन केले आहे. आयसीएमआरच्या सूत्रानुसार, एक वर्षावरील मुलांसाठी दर हजार कॅलरी घेताना, त्यात १४ ग्रॅम फायबर हवे. याच रिपोर्टमध्ये आणखी एक उपयुक्त सूचना आहे. दोन ते १० वर्षापर्यंत वय + ५ इतके ग्रॅम फायबर असावे. फायबरयुक्त पदार्थांमुळे भूक कमी होते. खाण्याचे समाधान मिळते. ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल कमी राहून हृदयाचा त्रास वाचतो. या अहवालात फायबरयुक्त पदार्थांची यादी आहे. द्राव्य किंवा विरघळणारे फायबर असलेले पदार्थ ओट्स आणि ओटमील, मटार, गवार, फरसबी, मसूर, जव, फळे (सफरचंद आणि संत्रे) व पालेभाज्या. अद्राव्य फायबर असलेल्या पदार्थांत कोंडा न काढलेले तृणधान्यांचे पीठ असते. या फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहते. बद्धकोष्ठ, मूळव्याध टळतात. या अहवालात अशा अनेक गोष्टींबद्दल उत्तम मार्गदर्शन आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांनी यावर चिंतन केले, तर 'टाइप-१' मधुमेह नियंत्रित करून उत्तम आयुष्य जगता येते. (लेखक मधुमेहतज्ज्ञ आहेत.)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UkFeIzg

No comments:

Post a Comment