अकोला : माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसैनिक नाराज झाले आहेत. शुक्रवारी बाजोरियांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली, या दरम्यान, बजोरियांनी पक्षातील गेल्या २५ वर्षात झालेल्या वेदना अन् खंत व्यक्त केल्या. आता यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना खुलं आव्हान दिलं जात आहे. बाजोरिया हे कधीच शिवसेनेसाठी दखलपात्र नव्हते आणि नाहीत, शिवसेना सोडल्यानंतर स्वतःची खरी ताकद आणि किंमत त्यांना आगामी काळात शिवसैनिक दाखवून देणार आहेत, असे व्यक्तव्य शिवसेना नेते विजय मालोकार यांनी केलं. ते अकोल्यात बोलत होते. नेमके काय म्हणाले मालोकार? शिवसेनेच्या भरोशावर 'गब्बर' झालेले माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अनेक पोकळ वल्गना सुरू केल्या आहेत, असा आरोप विजय मालोकार यांनी केला. मुळात बाजोरिया यांना किती गांभीर्यानं घ्यायचं?, हाच खरा प्रश्न आहे. तिनदा विधान परिषदेचे आमदारकी, विधानसभेची उमेदवारी आणि मुलगा विप्लव बाजोरियाला परभणी-हिंगोली मतदारसंघातून पक्षाकडून आमदारकी, वेळोवेळी पक्षाकडून दिलेले विविध विकास निधी यानंतरही बाजोरियांची भूक भागली नाही, असा आरोप विजय मालोकार यांनी केला. बाजोरियांसारख्या राजकारण्याचा बुरखा पांघरलेल्या व्यापारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून अकोला विकासाच्या गप्पा म्हणजे, या शतकातला सर्वात मोठा विनोद म्हणता येईल, असं विजय मालोकार म्हणाले. स्वतःला खूप मोठे नेते समजणाऱ्या गोपीकिशन बाजोरियांनी आगामी अकोला महापालिकेतील ९१ पैकी कोणत्याही वार्डातून उभे राहावं, शिवसैनिक त्यांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असं आव्हान त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं असल्याचं मालोकर म्हणाले. स्वतःला मोठा समजणाऱ्या बाजोरियांना आता शिवसेना सोडल्यानंतर स्वतःची खरी ताकद आणि किंमत बाळासाहेबांचे शिवसैनिक दाखवून देणार आहेत, असेही विजय मालोकार यांनी म्हटलं आहे. विजय मालोकार हे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मालोकार बाजोरियांना कसं आव्हान देतात हे आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येईल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LnqYZxE
No comments:
Post a Comment