Breaking

Sunday, July 24, 2022

'आदित्य ठाकरे आता भिंगरीप्रमाणे...', राजीनाम्याच्या आव्हानावरून गुलाबराव पाटलांचा टोला https://ift.tt/Kkw1JQW

जळगाव : राज्यात एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये शिवसेना कुणाची व धनुष्यबाण कुणाचा यावरून सध्या जोरदार वाद रंगलाय. आता शिवसेनेच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली. धनुष्यबाण कुणाचा, आणि शिवसेना कुणाची याच मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. त्याला गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिलंय. राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये. राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यामुळे जीवनदान मिळालंय, असं गुलाबराव पाटील म्हणाले. अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये जे चांगलं नातं आमचं आणि राष्ट्रवादीमध्ये होतं ते त्यांनी जोपासावे, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरही पाटील बोलले. जे मंत्रीपद सोडून आलोय, त्याची पर्वा नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, त्याची चिंता नाही. फक्त धनुष्यबाण आणि शिवसेना वाचवायची असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. जळगावात गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना कुणाची व धनुष्यबाण कुणाचा यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना व याच शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट यांच्यात जोरदार लढाई सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. दोघांकडून शिवसेना व धनुष्यबाण आपलाच असल्याचे दावे केले जात असल्याचे दिसून येत आहे. आता यावर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनीही पुन्हा वक्तव्य केलं आहे. आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलो आहे. धनुष्यबाण हा शिवसेनेचा आहे, व हीच शिवसेना शिंदे गटाचीच असून तीच शिवसेना वाचविण्यासाठी शिंदे गट बाहेर पडल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अद्यापही आपण शिवसेनेत असून पक्ष सोडला, बंडाळी केलेली नाही. जी शिवसेना आहे, तीच वाचविण्यासाठी उठाव केला असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे. यावरूनही गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ८० वर्षांचे शरद पवार तीन तीन वेळा जळगाव जिल्ह्यात येतात. अजित पवार, धनंजय मुंडे हे दौऱ्यावर येतात. आणि आमचा तीस वर्षांचा नेता येत नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. तसेच आता आदित्य ठाकरे भिंगरीप्रमाणे राज्यात दौरे करताहेत, त्याचवेळी जर त्यांनी असे दौरे केले असते तर बरं झालं असतंही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच राजीनामा देण्याचा संबंधच येत नाही, धनुष्यबाणावर आम्ही निवडणू आलेलो आहे. धनुष्यबाण शिवसेनेचा आहे, आणि शिवसेना वाचविण्यासाठी काम करत असल्यांचही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pGVDbZ3

No comments:

Post a Comment