दुबई : अफगाणिस्तानने बांगलादेशचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. या विजयासह अफगाणिस्तानने मानाचे स्थान पटकावले आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या संघांनाही जे करता आले नाही ते अफगाणिस्तानसारख्या संघाने करून दाखवले आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातील बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानचे गोलंदाज यावेळी त्यांच्यावर भारी पडले. फिरकीपटू मुजीब उर रेहमानने यावेळी बांगलादेशला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. मुजीबने दोन्ही सलामीवीरांना तर तंबूत धाडलेच, पण बांगलादेशचा सर्वात अष्टपैलू खेळाडू शकिब अल बसनचाही काटा त्याने काढला. मुजीबने अचूक आणि भेदक मारा करत यावेळी बांगलादेशची ३ बाद २४ अशी दयनीय अवस्था केली होती. मुजीबनंतर रशिद खानने यावेळी बांगलादेशच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. मुजीबनंतर रशिदनेही बांगलादेशच्या तीन फलंदाजांना बाद केले आणि त्यांची मधली फळी बेचिराख करून टाकली. त्यामुळे बांगलादेशची ६ बाद ८९ अशी अवस्था झाली होती. बांगलादेशचा संघ आता शतकही ओलांडणार नाही, असे वाटत होते. पण त्यावेळी बांगलादेशच्या मोसादेक होसेनने ३१ चेंडूंत नाबाद ४८ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच बांगलादेशला प्रथम फलंदाजी करताना १२७ धावा करता आल्या. बांगलादेशच्या १२८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची आश्वासक सुरुवात झाली नाही. बांगलादेशने त्यांची २ बाद ४५ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या इब्रहिम झारदान आणि नजिबुल्लाह झारदान यांनी दमदार भागीदारी रचली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नजिबुल्लाहने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत फक्त १७ चेंडूंत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. इब्रहिमने यावेळी ४१ चेंडूंत नाबाद ४२ धावा केल्या. अफगाणिस्तानने या सामन्यात विजयासह नेमकं काय केलं, पाहा...अफगाणिस्तानने बांगलादेशवर धडाकेबाज विजय साकारला. हा त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. यापूर्वी त्यांनी श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन विजयांसह आशिया चषक स्पर्धेत पहिल्यांदा सुपर -४ फेरीत जाण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील कोणत्याही संघाला सुपर - ४ फेरीत पोहोचता आलेले नाही. भारताने जर उद्या दुसऱ्या सामन्यात विजय साकारला तर त्यांना सुपर - ४ फेरीत पोहोचता येणार आहे. पण या फेरीत पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मात्र अफगाणिस्तानने पटकावला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7irckCZ
No comments:
Post a Comment