Breaking

Friday, August 26, 2022

कोकणाच्या मुद्यावर सोबत, भास्कर जाधवांसह भाजप मंत्र्यांकडून मुंबई गोवा महामार्गाच्या एकत्र पाहणीची चर्चा https://ift.tt/Ds9Curf

रत्नागिरी : करोना विषाणू संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पहिल्यांदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. वर्षभर मुंबईत कामानिमित्त राबणारा कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवाला गावी जात असतो. कोकणात जाणाऱ्या आणि परत मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रशासकीय यंत्रणा, एसटी प्रशासन, राज्य सरकार कामाला लागलं आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोलमाफी देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र, कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे मुंबई गोवा महामार्ग होय. या महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. गणेशोत्सव तोंडावर आला आहे असं असताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी आज आले होते. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पक्षीय बंधन बाजुला ठेवत कोकणच्या प्रश्नी मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या गाडीतून प्रवास देखील केला. मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सभागृहात देखील आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी हा प्रश्न सुटावा यासाठी सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन भाजप मंत्र्यांचे परशुराम घाटात स्वागत केले. इतकेच नाही तर या प्रश्नावर थेट चर्चा करता यावी यासाठी त्यांनी मतभेद बाजुला ठेवत परशूराम बस स्टॉप ते गेस्ट हाऊस असा एकत्र प्रवासही केल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी जिल्हयातील शिवसेनेचे जे दोन आमदार सद्यस्थितीत उद्धव ठाकरे गटात आहेत त्यापैकी भास्कर जाधव आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कोकणातील हा महामार्ग अत्यंत महत्वाचा व संवेदनशील विषय झाला आहे.यासाठी भास्कर जाधव यांनी नेहमीच प्रशासनातील अधिकारी व ठेकेदार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर असताना किमान या मार्गावरील खड्डे भरले जावेत अशी प्रमुख मागणी आहे.पण एकंदरीत असलेली या मार्गाची दुरवस्था,धोकादायक झालेला परशुराम घाट या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी व हे काम सुरळीत मार्गी लागावे यासाठी आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी या कोकणातील महामार्गाची परिस्थिती कथन केली. मात्र, यामध्ये काही राजकीय चर्चा झाली का किंवा काय? याबाबत मात्र समजू शकलेले नाही.पण दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतील प्रवास मात्र चर्चेत आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9mjnuV8

No comments:

Post a Comment