नागपूर : रोहित शर्मा एकदा खेळायला लागला की फक्त त्याची फलंदाजी बघत राहाविशी वाटते आणि आजच्या सामन्यात तेच घडलं. रोहितने यावेळी नेत्रदीपक फटकेबाजी करत तुफानी फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धुलाई करत त्याने अर्धशतक झळकावले आणि संघाला एकहाती विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने आपले या मालिकेतील आव्हान वाचवले. या विजयासह भारताने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ९१ धावांचे आव्हान ठेवले होते. राहुल, कोहली, सूर्यकुमार लवकर बाद झाले असले तरी रोहितने यावेळी संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या ९१ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने दणक्यात सुरुवात केली, सुरुवातीपासूनच रोहितने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. यावेळी जुना हिटमॅन पुन्हा एकदा पाहायला मिळता. पण दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल हा झटपट बाद झाला. राहुलने यावेळी १० धावा केल्या. राहुलनंतर विराट कोहली फलंदाजीला आला आणि त्याने दमदार सुरुवात केली. पण यावेळी ११ धावांवर तो बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्यानंतरच्या चेंडूवर सूर्यकुनार यादव बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. पण यावेळी रोहित मात्र खेळपट्टीवर ठाम उभा होता आणि विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तो सज्ज असल्याचे पाहायला मिळत होते. दुसऱ्या करो या मरो सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने भारताच्या दुसऱ्या षटकात कमाल केली. अक्षरच्या या षटकात कॅमेरून ग्रीन हा पाच धावांवर धावचीत झाला. त्यानंतर त्याने याच षटकात ग्लेन मॅक्सवेलला बाद केले, ग्लेमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही आणि तो शून्यावर बाद झाला. त्यानंतरच्या षटकात अक्षरने पुन्हा एक धक्का ऑस्ट्रेलियाला दिला. अक्षरने यावेळी टिम डेव्हिडला स्वस्तात बाद केले. ऑस्ट्रेलियाचे विकेट्स एकामागून एक पडत असताना फिंच मैदानात उभा होता आणि दमदार फटकेबाजी करत होता. पण बुमराने त्याला आपल्या पहिल्या षटकात क्लीन बोल्ड केले. पण बोल्ड झाल्यानंतर फिंचने नेमकं काय केलं, याची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. बुमराने यावेळी आपले मुख्य अस्त्र असलेला यॉर्कर बाहेर काढला आणि त्यावर त्याने फिंचला बाद केले. फिंचला आपण बोल्ड झाल्याचे समजले आणि तो पुढे सरसारवला. यावेळी फिंचने आपली बॅट हातात घेतली आणि त्याने बॅटने बुमराला सलाम केला. कारण बुमराचा हा चेंडू खेळण्यासाठी शक्यच नव्हता. पण प्रतिस्पर्धी असूनही यावेळी फिंचने बुमराचे कौतुक केल्याचे पाहायाल मिळाले. फिंचने यावेळी ३१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. फिंच बाद झाल्यावर भारतीयांना दिलासा मिळाला. पण हा दिलासा काही क्षणापुरता होता. कारण या सामन्यातही मॅथ्यू वेडने भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. वेडने यावेळी २० चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ४३ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या संघाला यावेळी आठ षटकांमध्ये पाच विकेट्स गमावत ९० धावा करता आल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hy625KO
No comments:
Post a Comment