अतिपावसाने घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाच्या बातमीने हायसे वाटले असले तरी प्रत्यक्षात निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यंदा बसत असल्याने ही आनंदाची बातमी केव्हा दु:खात परावर्तित होईल, हे सांगता येणार नाही. अतिवृष्टीने कहर तर केला आहेच; पण अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने शेतजमीन अक्षरश: खरवडून गेली आहे. शेतात मातीचा अवशेषच शिल्लक राहिला नसताना, भविष्यात शेती तरी कशी करायची, असा प्रश्न काहींना जरूर पडला असेल. आणखी किती दिवस पर्जन्याचा असा दाह सोसावा लागणार, या विवंचनेत शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकही आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा पुन्हा एकदा साखरेचे अतिरिक्त उत्पादन होण्याचा अंदाज छाती दडपविणारा आहे. मागील हंगामातील ६० साठ लाख मेट्रिक टन साखरेचा साठा अजूनही शिल्लक असताना, येऊ घातलेल्या अंदाजे १३८ लाख मेट्रिक टन साखरेचे करायचे काय, अशी चिंता सरकारला पडणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांनी आधीच गांगरून गेलेल्या सरकारने शेतीहिताचे काही चांगले निर्णय नक्कीच घेतले; पण तरीही निर्यातीतील धरसोडीमुळे शेतीमालाच्या परकीय बाजारपेठेची शाश्वती राहिलेली नाही. गतवर्षी अतिरिक्त उसामुळे कारखाने बराच काळ चालवावे लागले. परिणामी उतारा घटला. साहजिकच दर कमी मिळाला. शेतकरी संघटनांना स्वाभाविकच आंदोलनाचे अस्त्र मिळाले. भविष्यातील हे सारे सव्यापसव्य टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन गाळप हंगाम महिनाभर आधी म्हणजे १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासोबतच घसघशीत 'एफआरपी'(रास्त व किफायतशीर दर) जाहीर करून टाकला. वरकरणी हा निर्णय दिलासादायक वाटेल. परंतु, दिवाळीनंतरच्या पंधरवड्यातच ऊसतोड कामगार येऊ शकतात, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाही. यंदा दिवाळी ऑक्टोबरच्या अखेरीस असल्याने तत्पूर्वी काहीतरी जुगाड करून ऊसतोड सुरू झाली तर आनंदच आहे. प्रत्यक्षात तसे होण्याविषयी उत्पादक शेतकरी व कारखानदारच साशंक आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील कामगार स्वत:च्या शेतीची व इतर कौटुंबिक कामे आटोपून मगच बाहेर पडतात. वर्षानुवर्षे हे असेच चालत आले आहे. गेले दोन-तीन वर्षे मराठवाड्यातही पावसाने आबादानी केल्याने तेथील शेतीची कामेही वाढली आहेत. 'एफआरपी'साठी चार विभाग केले असून, पश्चिम महाराष्ट्र वगळता इतरत्र उतारा शक्यतो दहाच्या आतच असतो. दहा टक्क्यांच्या पुढे उतारा असल्यासच तीन हजार ५० रुपये 'एफआरपी' मिळू शकेल. विदर्भ, मराठावाडा व उत्तर महाराष्ट्रात उतारा आठ ते नऊ टक्के पडतो. परिणामी दोन हजारांच्या आतच भाव मिळू शकेल, असे दिसते. तरीही, सरकारने ठरविल्यानुसार सगळे काही साग्रसंगीत पार पडले तर आनंद आहेच; परंतु, तसे झाले नाही तर काय? प्राप्त परिस्थितीत पर्यायी उपायांचाही विचार आजच करायला हवा. सुदैवाने गेल्यावर्षीपासून साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने निश्चित केल्याने कारखान्यांना फारशी तोशीस पडणार नाही, असा एक आशावाद आहे. शिवाय, इथेनॉलच्या वापराबाबत प्रोत्साहन असल्याने त्याचाही फायदा भाव देताना होऊ शकेल. गेल्या हंगामात दोनशे कारखान्यांनी दोन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले. यंदा २०३ साखर कारखाने सुरू होतील, असा अंदाज आहे. त्यातून १३८ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गतवर्षी १३७ लाख टन उत्पादन करून महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला मागे टाकले. यावेळीही हे समाधान निश्चित मिळेल. मात्र, एक लाख हेक्टरवर वाढलेले लागवड क्षेत्र, अतिरिक्त ऊस वेळेवर गाळप करणे व त्यानंतर विक्रमी साखरेची योग्य दरात विल्हेवाट लावणे, ही आव्हानेही पेलावी लागतील. साखर उत्पादनात देशात अव्वल स्थान मिळविल्याचे गुलाबी चित्र रंगवितानाच, त्याच्या पोटातील शेतकऱ्यांच्या दु:स्थितीचे करडे रंग दुर्लक्षिता येणार नाहीत. बीड जिल्ह्यातील हिंगणगावात शिल्लक उसाच्या फडातच शेतकऱ्याने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली होती, यावरून ऊस प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते. उसाबरोबरच कांद्याच्या समस्येबाबतही शासनाने नुकतेच काही निर्णय घेतले. अतिपावसाने साठवलेला कांदा सडत असताना, 'नाफेड'ला तो खरेदी करण्याची विनंती करणे म्हणजे 'बैल गेला अन् झोपा केला' असा प्रकार झाला. वास्तविक आधीच सरकारी खरेदीचा निर्णय घेतला असता तर आज कांदा उत्पादकांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली नसती. दिवसागणिक निसर्गाच्या लहरीपणाचे फटके वाढत आहेत. अशा स्थितीत आपत्कालीन व्यवस्था अधिक मजबूत करायला हवी. हवामान बदलाच्या परिणामी शाश्वत पीक म्हणून शेतकऱ्यांपुढे सध्या उसासारख्या नगदी पिकाचा पर्यायही किफायतशीर राहिला नाही तर पर्यायी पीकपद्धतीबरोबरच, बदलत्या पर्यावरणात तग धरू शकतील, अशा पिकांच्या जाती तयार कराव्या लागतील. संशोधनाच्या क्षेत्रात एकूणच आनंदी आनंद असल्याने हाताशी आहे ते निर्धारपूर्वक जपणे, वृद्धिंगत करणे याला पर्याय नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YQy3vRw
No comments:
Post a Comment