Breaking

Tuesday, September 13, 2022

सामान्य आणि एसी लोकल वाद सुरू असताना मध्य रेल्वेने शोधला भन्नाट पर्याय, पण... https://ift.tt/QBEXFHe

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मध्य रेल्वेवर सामान्य आणि वातानुकूलित लोकल असा वाद सुरू झाला असताना अर्ध वातानुकूलित लोकल फेऱ्यांच्या पर्यायाचा पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र या लोकलची चाचणी रखडल्याची माहिती समोर आली आहे. अर्ध वातानुकूलित लोकलला डब्यांचे समीकरण कसे असावे, यावर रेल्वे मंडळाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. अर्ध वातानुकूलित लोकलसाठी आवश्यक रेल्वेगाडी दोन वर्षांहून अधिक काळापासून मुंबईत पडून आहे. या लोकलची अंतर्गत चाचणी झाली मात्र प्रत्यक्ष मार्गावर चाचणी झालेली नाही. अर्ध वातानुकूलित लोकलमध्ये नऊ सामान्य आणि तीन वातानुकूलित किंवा सहा सामान्य आणि सहा वातानुकूलित यापैकी कोणत्या समीकरणाने प्रत्यक्ष मार्गावर चाचणी घ्यायची याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर निर्णय घेण्याआधीच पूर्ण वातानुकूलित लोकल चालवण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. यामुळे अर्ध वातानुकूलित लोकलची चाचणी रखडली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य रेल्वेवर सामान्य आणि वातानुकूलित लोकलचा मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना प्रवासासाठी लोकलव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. अशातच सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी वातानुकूलित लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. जनआंदोलन लक्षात घेता स्थानिक आमदार, खासदारदेखील प्रवाशांच्या बाजूने उभे राहिले आहेत. यामुळे तूर्तास नवीन १० वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र सुरक्षित प्रवासासाठी दरवाजे बंद असलेली वातानुकूलित लोकल चालवणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य आणि वातानुकूलित लोकल या वादातील सुवर्णमध्य शोधणार तरी केव्हा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एसी फेऱ्या वाढवण्याची मागणी वातानुकूलित (एसी) लोकलचा पास आणि तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एसी लोकलचा पास द्वितीय श्रेणीच्या पासच्या तुलनेत प्रचंड महाग आहे. यामुळे एसी पास आणि तिकीट काढणाऱ्या प्रवाशांकडून एसी लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. याची उत्तरे केव्हा मिळणार? - साध्या लोकलचा प्रथम-द्वितीय श्रेणीचा पास काढल्यावर रविवारसह सर्व दिवस लोकल फेऱ्या उपलब्ध आहेत. यामुळे प्रवाशांना सुट्टीच्या दिवशी प्रवास करता येतो. रविवारी एसी लोकलच्या ७५ टक्के लोकल फेऱ्या रद्द असतात. कार्यालयीन दिवशी (सोमवार ते शनिवार) ५६ फेऱ्या आणि रविवारी केवळ १४ फेऱ्या धावतात. कार्यालयीन दिवसात एखाद्या कारणामुळे वातानुकूलित लोकल रद्द झाल्यास त्या दिवसाच्या पास अथवा तिकिटाचे काय? एसी गाडी रद्द असताना स्थानकातून एसी तिकीट विक्री होत असते, प्रत्यक्षात मात्र ही लोकल रद्द असते हे प्रकार केव्हा थांबणार? या प्रश्नांची उत्तरे मध्य रेल्वेने द्यावीत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6finoF0

No comments:

Post a Comment