Breaking

Tuesday, September 6, 2022

पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन ‘निर्विघ्न’; उच्च न्यायालयाकडून याचिका निकाली https://ift.tt/W8Rmprg

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘पुण्यातील लक्ष्मी रोडवरून पाच मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतरच अन्य मंडळांना तेथून विसर्जन मिरवणूक नेता येईल, ही पडलेली प्रथा भेदभावपूर्ण आहे’, असा आरोप करत पुणे बधई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बधई यांनी केलेली रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ट्रस्टला कोणताही दिलासा न देता मंगळवारी निकाली काढली. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहिल्या पाच मानाच्या गणपतींची व त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक निर्विघ्न होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम गणपती, तुळशीबाग गणपती मंडळ व केसरी वाडा गणपती या पाच मानाच्या व मोठ्या गणपती मंडळांनी स्वत:च नियम तयार केले आणि नंतर ती एकप्रकारे प्रथा झाली. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मी रोडवरून जोपर्यंत या पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन सुरू होत नाही, तोपर्यंत त्या रस्त्यावर अन्य कोणत्याही मंडळाला आपल्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू करू देण्यास पोलिस मनाई करतात. शिवाय सकाळी १० वाजल्यापासून या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर ती २४ तास किंवा त्याहून अधिक काळ चालते. परिणामी संपूर्ण दिवस हा रस्ता एकप्रकारे अडवलाच जातो आणि लहान मंडळांनाही विसर्जनाला विलंब होतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचीही प्रचंड गैरसोय होते’, असे याचिकेत म्हटले होते. परंतु, न्या. संजय गंगापूरवाला व न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीत मानाच्या गणपती मंडळांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी याचिकेला तीव्र विरोध दर्शवला. ‘याचिकाकर्त्याने रिट याचिकेत स्वत:साठी काही मागितले नसून अन्य मंडळांसाठी निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे ही याचिकाच सुनावणीयोग्य नाही. शिवाय आपली विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवरूनच जायला हवी, असे याचिकाकर्ता कसे म्हणू शकतो?’, असे म्हणणे अंतुरकर यांनी मांडले. पोलिसांतर्फे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीही याचिका सुनावणीयोग्यच नसल्याचा युक्तिवाद मांडला. ‘इतर मंडळांची गैरसोय होते वगैरे याचिकेत म्हटले आहे. परंतु, सामाजिक प्रश्न म्हणून याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका केलेली नाही. शिवाय पाच मानाच्या गणपतींनंतर आमची मिरवणूक जाऊ द्या, असे याचिकाकर्त्याने पोलिसांकडे दिलेल्या अर्जात म्हटले असताना याचिकेत आमची मिरवणूक आधी जाऊ द्या, असे म्हटले आहे. शेवटी कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न हा पोलिसांच्या अखत्यारीतील आहे’, असे म्हणणे कुंभकोणी यांनी मांडले. तर ‘विसर्जन मिरवणुका मुदतीत पूर्ण कराव्यात, असे पोलिस म्हणत असले, तरी अडीच किमी अंतरासाठी मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुका या २०-३० तास चालतात. परिणामी इतर मंडळांची व नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. तरीही पोलिस आमच्या तक्रारीच ऐकून घेत नाहीत’, असे म्हणणे याचिकाकर्त्यातर्फे अॅड. असीम सरोदे यांनी मांडले. अखेरीस ‘मिरवणुकांना विलंबच होईल आणि प्रतिवादी मंडळांकडून कायदा व नियमांचे पालन होणार नाही, असे गृहित धरून याचिका करण्यात आली आहे. सरतेशेवटी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न प्रशासनांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या प्रश्नात न्यायालय प्रतिवादींविरोधात कोणताही आदेश देऊ शकत नाही. याचिकाकर्त्यांच्या अर्जाबाबत पोलिस प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा’, असे स्पष्ट करून खंडपीठाने याचिका निकाली काढली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iUloTHd

No comments:

Post a Comment