वृत्तसंस्था, नवी दिल्लीः जगातील पहिल्या नाकावाटे घेण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती करण्याचा मान भारताला मिळाला आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक इंटरनॅशनल या कंपनीने तयार केलेल्या ‘’ या लशीला मंगळवारी भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली. १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस घेता येणार आहे. भारत बायोटेकच्या ‘इनकोव्हॅक’ या लशीच्या दोन मात्रा असतील. तसेच यापूर्वी कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना बुस्टर मात्रा म्हणूनही ही लस घेता येईल. यासाठी कंपनीने तीन निरनिराळ्या चाचण्या घेतल्या होत्या. सुमारे चार हजार स्वयंसेवकांवर त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी कुणामध्येही आरोग्यविषयक गुंतागुंत उद्भवली नाही, असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. विशेषत: अल्प किंवा मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी ही लस उपयुक्त ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे. नाकावाटे घेण्याच्या या लशीमुळे नाकाच्या वरील भागात प्रतिजैविके तयार होतात व त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखणे व रोगाची बाधा टाळणे शक्य होईल, असे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे. या नव्या लशीच्या वापरास परवानगी देतानाच कोव्हॅक्सिनसोबत ‘इनकोव्हॅक’ ही लस घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती व आरोग्य सुरक्षेत किती वाढ होईल, याचा अभ्यास करण्यासाठी भारत बायोटेकमार्फत सुरू असलेल्या चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू करण्यासही भारत औषध महानियंत्रकांनी कंपनीला परवानगी दिली आहे. तंत्रज्ञानात बदल करण्याचा प्रयत्न ‘इनकोव्हॅक ही लस जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या करोना प्रतिबंधक लशींची मागणी घटली असली तरी लशींबाबतच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील. भविष्यातील संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी तंत्रज्ञानात बदल करण्याचा हा प्रयत्न आहे’, असे कंपनीचे अध्यक्ष कृष्ण एला यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tXePgFy
No comments:
Post a Comment