म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईतः आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली असून, भाजपही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असून, काँग्रेसही लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी विविध राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी मतदान व ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. १४ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १५ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी तर १७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतरची मुंबईतील ही पहिलीच पोटनिवडणूक असून, यासाठी शिवसेना उमेदवारास पाठिंबा देण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याची माहिती काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्याने 'मटा'ला दिली. या जागेसाठी शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे या मतदारसंघाची धुरा सोपविण्यात आली आहे. मात्र काँग्रेसचे माजी उपमहापौर राजेश शर्मा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने या जागेबाबत पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून चाचपणी करीत होता. शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बोलणी सुरू झाल्यानंतरही काँग्रेसने याबाबत कोणतीही भूमिका जाहीर न केल्याने ही जागा महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मुंबई काँग्रेसकडून यासंदर्भातील एक प्रस्तावही दिल्लीदरबारी पाठविण्यात आल्याची माहिती पुढे आली होती. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसही शिवसेनेला मदत करणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्याकडून सांगण्यात आले. या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोग 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाला देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने ही निवडणूक लढवल्यास धनुष्यबाणाचे चिन्ह निवडणूक आयोग शिवसेनेला देणार का, याविषयीही उत्सुकता आहे. शिंदे गट की, भाजप? शिवसेना म्हणून शिंदे गट या जागेवर दावा करून ती लढवणार की भाजप आणि शिंदे गट एकत्रितपणे ही जागा लढविणार याबाबत मात्र अद्याप स्पष्टता व्हायची आहे. शिंदे गटाने ही निवडणूक लढवल्यास उद्धव ठाकरे विरुद्ध अशी लढत होईल. त्यामुळे मुंबईत कुणाची ताकद असेल याचा अंदाज येईल. त्याचा थेट परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YMxl3QH
No comments:
Post a Comment