Breaking

Saturday, October 15, 2022

बोरिवली-ठाणे आता २० मिनिटांत पोहोचणार; मुंबईकरांचा सुमारे एक तासांचा वेळ वाचणार https://ift.tt/QuawSR1

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः बोरिवली-ठाणे हा दीड तासाचा प्रवास १५ ते २० मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भुयारी मार्ग प्रकल्पाची प्रतीक्षा संपणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी पुढील दोन महिन्यांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) निविदा काढल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे. सद्यस्थितीत ठाण्याला जाण्यासाठी बोरिवलीकरांना घोडबंदर रस्त्याचा आधार आहे. मात्र गुजरात आणि दिल्लीकडून येणारी अवजड वाहने याच रस्त्याने पुढे ठाणे आणि जेएनपीटीकडे जातात. त्यातून या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परिणामी येथे बाराही महिने कोंडी होते. त्यातून बोरीवली ते ठाणे या अंतरासाठी मुंबईकरांना दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना कायमच त्रासाला सामोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी उद्यानाच्या खालून ११.८ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. यापूर्वी एमएमआरडीए दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन बोगदे बांधणार होते. मात्र त्यात बदल करण्यात आला असून आता प्रत्येकी दोन मार्गिकांचे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. यासाठी सुमारे सात हजार कोटी खर्च येणार आहे. यातील भुयारी मार्ग १०.२५ किमी लांबीचा असेल. तर १.५ किमी अंतर जमिनीवर असेल. दरम्यान, सद्यस्थितीत बोरिवली ते ठाणे प्रवासासाठी फाऊंटन येथून घोडबंदर रस्त्यावरून वळसा घालून जावे लागते. त्यातून ठाणे-बोरिवली हे अंतर सुमारे २५ किलोमीटर पडते. मात्र या भुयारी मार्गामुळे बोरिवली ते ठाणे अंतर सुमारे १२ किलोमीटरने घटणार आहे. प्रवासाचा वेळ एक तासाने वाचणार आहे. तसेच हजारो वाहनांच्या लाखो लिटर इंधनात बचत होईल आणि पर्यावरण संवर्धनालादेखील मदत होणार आहे. ‘या प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी पुढील दोन महिन्यांत निविदा काढल्या जाणार आहेत. कंत्राटदाराच्या नियुक्तीनंतर पाच वर्षांत या बोगद्याचे काम पूर्ण होईल,’ अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. खर्च - ७ हजार कोटी भुयारी मार्गाची लांबी - ११.८ किमी प्रवास वेळ - २० मिनिटे. प्रवासाची बचत - सुमारे एक तासाची बचत होणार.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NItYkOM

No comments:

Post a Comment