Breaking

Monday, October 17, 2022

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी https://ift.tt/tIKJyQZ

नवी दिल्लीः भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Justice D Y chandrachudd) यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास संमती दिली आहे. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबरला संपणार आहे. लळीत यांनी केंद्र सरकारकडे धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपणार आहे. केंद्र सरकारने प्रक्रियेप्रमाणं लळीत यांच्याकडे देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्याबाबत विचारणा केली होती. उदय लळीत यांनी प्रकियेप्रमाणं सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी भावी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर कायदा मंत्री रिजीजू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं अभिनंदन केलं आहे. धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड यांनी देखील सरन्यायाधीश म्हणून काम केलं होतं. २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालावधीत त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं होतं. तब्बल ७ वर्ष ४ महिने अशा प्रदीर्घ काळासाठी यशवंत चंद्रचूड सरन्यायाधीश कार्यरत होते. धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं आहे. धनंजय चंद्रचूड हे उदारमतवादी, प्रागतिक निकालांसाठी ओळखले जातात. त्यांनी अलीकडेच अविवाहित महिलांना गर्भधारणेपासून २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यास मान्यता देणारा निकाल दिला होता. धनंजय चंद्रचूड १३ मे २०१६ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. चंद्रचूड यांनी महाधिवक्ता म्हणून देखील काम केलं आहे. धनंजय चंद्रचूड यांनी नवी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र ऑनर्समधून बीए पदवी मिळवली.तर एलएलबीची पदवी दिल्ली विद्यापीठाच्या कायदा विभागातून पूर्ण केली. एलएलएम पदवी आणि न्यायशास्त्रातील पदवी अमेरिकेतील हॉर्वर्ड लॉ स्कूलमधून पूर्ण केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Yg538af

No comments:

Post a Comment