Breaking

Friday, October 28, 2022

बापरे! एक लाख रोजगार बुडाले, महत्त्वाचे प्रकल्प गेल्याने महाराष्ट्राचे जवळपास २ लाख कोटींचे नुकसान https://ift.tt/zt9ha86

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वेदान्ता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा वाद शांत होतो न होतो, तोच 'टाटा एअरबस'चा प्रकल्पही गुजरातला गेल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्रातून हे दोन महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने आणि गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातून गेलेल्या किंवा काही कारणांमुळे रद्द झालेल्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या प्रकल्पांमुळे अंदाजे एक लाख ८० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला राज्य मुकले असून, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या तयार होणारा एक लाख लोकांचा रोजगार बुडाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रकल्प बडोद्याला 'टाटा एअर बस सी-२९५' हा २२ हजार कोटींचा विमानबांधणी प्रकल्प नागपूर येथील मिहानमध्ये प्रस्तावित असताना तो आता बडोद्याला जाणार असल्याचे नक्की झाले आहे. यातून सुमारे सहा हजार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. अलीकडेच वेदान्ता फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातील एक लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प तळेगाव येथून गुजरातमधील ढोलेरा येथे गेल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली होती. त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही आपले पंतप्रधान मोदींशी बोलणे झाले असून महाराष्ट्रात यापेक्षाही मोठे प्रकल्प येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे म्हटले होते. त्यानंतरही 'टाटा एअरबस'चा प्रकल्प गुजरातला गेल्याने आता राजकीय विरोधकांसोबतच सामान्य नागरिकांकडूनही सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अन्य प्रकल्पही बाहेर राज्यातील बल्क ड्रग प्रकल्प हा तीन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प रोहा येथे प्रस्तावित होता. यातून तब्बल ५० हजार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार होती. मात्र केंद्राने गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी बल्क ड्रग प्रकल्प करण्याला तत्वतः मान्यता देऊन महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली होती. औरंगाबाद येथे वैद्यकीय उपकरणाचा ४२४ कोटींचा येणारा प्रकल्पातही केंद्राने तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये नेण्याला तत्त्वतः मान्यता दिल्याने राज्यात होऊ शकला नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्रकल्प.... गुंतवणूक.... रोजगार क्षमता वेदान्ता फॉक्सकॉन.... १.५४ लाख कोटी.... १,००,००० टाटा एअर बस सी-२९५.... २२,००० कोटी ....६,००० बल्क ड्रग प्रकल्प.... ३,००० कोटी.... ५०,००० वैद्यकीय उपकरणे निर्मिती पार्क .... ४२४ कोटी.... ३,०००


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pDdk3Os

No comments:

Post a Comment