मुंबई : माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. हेगडे यांनी आपल्या समर्थकांसह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत कृषणा हेगडे यांनी समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्याकडून हेगडे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली. कृष्णा हेगडे यांचा काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता बाळासाहेंबाची शिवसेना राजकीय प्रवास राहिलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते. कृष्णा हेगडे कोण आहेत? कृष्णा हेगडे यांचा मुंबईतील विले पार्ले भागात प्रभाव आहे. हेगडे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये भाजपमधून शिवसेनेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.मात्र, दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी शिवबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. कृष्णा हेगडे यांचा राजकीय प्रवास कृष्णा हेगडे यांचा प्रभाव मुंबईतील विले पार्ले भागात आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्याशी मतभेद झाल्यानं कृष्णा हेगडे यांनी नवा मार्ग स्वीकारला होता. हेगडेंनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी भाजप प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसानंतर हेगडेंनी भाजपची साथ सोडून शिवसेनेची वाट धरली होती. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी कृष्णा हेगडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर कृष्णा हेगडे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qU8Qryt
No comments:
Post a Comment