मुंबई : 'हॅपीनेस फॉर ऑल' या नावाने जाहिरातबाजी करून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार बोरिवलीतून समोर आला आहे. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या पैशांची शेअर्स तसेच इतर माध्यमात गुंतवणूक करून त्यातून चांगला परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विशेष करून सेवानिवृत्त झालेल्या अनेकांनी चांगला परतावा मिळेल या लोभाने या योजनेत गुंतवणूक केली. मात्र गुंतवणूकदारांना परतावा देण्याची वेळ येताच कंपनीचा मालक कार्यालय बंद करून पसार झाला. यामध्ये सुमारे २३ गुंतवणूकदारांची ८८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे आत्तापर्यंतच्या तक्रारींवरून दिसून आले आहे. एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या श्रीवल्लभ यांना निवृतीमध्ये मिळालेली काही रक्कम जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवायची होती. याचदरम्यान त्यांच्या परिचयातील व्यक्तीने 'हॅपीनेस फॉर ऑल' या योजनेबाबत सांगितले. योजना चालविणाऱ्या वडाळा येथील दीपक म्हसकर यांच्याबाबत माहिती दिली. म्हसकर यांच्या बोरिवली येथील कार्यालयात जाऊन श्रीवल्लभ यांनी या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली. दोन लाख रुपये गुंतविल्यास साडेतीन महिन्यांत तीन लाख रुपये मिळतील असे म्हसकर यांनी सांगितले. श्रीवल्लभ यांनी या योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आणि दोन लाख रुपये धनादेशातून म्हसकर यांना दिले. याबदल्यात म्हसकर याने नोटरी केलेला करारनामा आणि एक पावती दिली. साडेतीन महिने पूर्ण झाल्यानंतर श्रीवल्लभ यांनी म्हसकरला गुंतविलेल्या पैशाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे आणि नंतर त्याने फोनच घेणे बंद केले. म्हसकर याने आपली रक्कम अन्य कुठे गुंतवली याची माहिती घेण्यासाठी श्रीवल्लभ याने कार्यालय गाठले असता ते बंद आढळले. व्याप्ती वाढण्याची शक्यता 'हॅपीनेस फॉर ऑल' आणि दीपक म्हसकर याच्याबाबत अधिक माहिती घेत असताना या योजनेत इतरही अनेकांनी गुंतवणूक केल्याचे समजले. श्रीवल्लभ यांना गुंतवणूक केलेल्या जवळपास २३ जणांची माहिती मिळाली. त्यांनी या गुंतवणूकदारांनी 'हॅपीनेस फॉर ऑल' योजनेत गुंतविलेल्या रकमेची माहिती घेतली असता ही रक्कम ८८ लाख ५५ हजार रुपयांच्या घरात गेली. या गुंतवणूकदारांना सोबत घेऊन श्रीवल्लभ यांनी बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेली रक्कम आणि गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wc3v4hi
No comments:
Post a Comment