Breaking

Thursday, November 3, 2022

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; ऋतुजा लटकेंना फायदा होणार की नुकसान? https://ift.tt/e1dvLIC

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी होत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलं आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असून सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीस म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदानाची टक्केवारी होती. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेच्या अखेरीस या मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीचा काय परिणाम होणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरी शिवसेना कोणाची, याचा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. अशातच अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आणि भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा सामना होणार, हे जवळपास निश्चित झालं. मात्र अखेरच्या क्षणी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील चुरसच निघून गेली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जाऊ लागलं. मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी ऋतुजा लटके यांना भाजपकडून 'नोटा'च्या माध्यमातून आव्हान दिलं जात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू होती. या निवडणुकीत नोटाला मत द्यावं, यासाठी भाजपकडून पैशांचं वाटप होत असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. मात्र समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही या निवडणुकीसाठी म्हणावा असा उत्साह दिसून आला. या सगळ्याचा परिपाक असा झाला की पोटनिवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी चांगलीच घसरली. खरंतर एखाद्या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणायचं असेल तर लोक उस्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडतात आणि त्यातून मतदानाची टक्केवारी वाढते. मात्र अंधेरी पूर्वमध्ये मात्र मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर घसरलेला मतदानाचा टक्का ऋतुजा लटके यांच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजच्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने मतमोजणी ही रविवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल नक्की काय लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TseKLPm

No comments:

Post a Comment