औरंगाबाद : प्रेम आणि प्रेयसीखातर तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात असे म्हणतात. असाच प्रत्यय औरंगाबदेत आला. पंचवीशीतील तीन तरुण आपल्या प्रेयसींचे लाड पुरविण्यासाठी चक्क दुचाकीचोर बनले. एवढेच नाही तर तिघांनी मिळून अनेक दुचाकी चोरी केल्या त्या विकल्या देखील. औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ लाख रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नारायण रामराव भंडारे वय-२१, कृष्णा ज्ञानोबा होळकर वय-२४,अर्जुन मधुकर वाकळे -२४ ( सर्व रा.रांजणगाव शेंनपूजी, ता.गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केलेल्या तिघा तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तिघेही तरुण हे वाळूज औधोगिक परिसरात राहणारे आहेत. तिघेही चांगले मित्र आहेत. तिघेही औद्योगिक नगरीतील तरुणींसोबत प्रेम प्रकरणात गुंतलेले आहेत. तिघांचंही प्रेम प्रकरण सुरु झाल्यावर त्यांनी तरुणींवर पैसे खर्च केले. मात्र, त्या नंतर पैशाची चणचण जाणवत असल्याने तरुणांनी कंपनीत काम करण्याचे ठरविले. मात्र, एके दिवशी तिघेही दारू पित असताना त्यांनी कंपनी ऐवजी आपण दुचाकी चोरी करून विक्री केली तर काही तासातच आपल्याला महिनाभराचा पगाराचा पैसा मिळेल, असा विचार केला. आपण आपल्या प्रेयसींना हव ते घेऊन देऊ शकतो, असे ठरवत तिघांनी एकमत केले. या नंतर तिघेही औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालय परिसर, बाजारपेठेतील भाग असलेल्या पैठणगेट भगात व कामगारांची वर्दळ असलेल्या औधोगिक नगरीत तिघेही दुचाकी चोरी करायचे. विशेष म्हणजे ज्या दुचाकींना हॅन्डल लॉक नाही किंवा ज्या दुचाकीला कोणतीही चावी लागते अशाच दुचाकींना हे तिघे लक्ष करायचे. तिघांनाही दारूचे देखील व्यसन आहे. चोरी करण्या अगोदर तिघेही यथेच्छ मद्य प्रशान करून चोरी करायचे.दुचाकी चोरी केल्यानंतर चोरी केलेली दुचाकी तिघेही ग्रामीण भागात विकायचे. चोरीची दुचाकी विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून तिघेही त्यांच्या प्रेयसींच लाड पुरवायचे. एक दोन वेळा चोरी केल्या नंतर त्यांना आपण पकडले जाणार नाही, असा गैरसमज त्यांना झाला होता. त्यामुळे तिघांनीही अनेक दुचाकी चोरल्या त्या विकल्या. मात्र, या प्रकाराची कुणकून गुन्हे शाखेचे उप निरीक्षक गजानन सोनटक्के यांना झाली होती. त्यांनी खबऱ्यांना कामावर लावत तिघांची कुंडली काढली. व खात्री होताच निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील गजानन सोनटक्के, सहाय्य्क फौजदार जवखेडे, दत्तात्रय गाडेकर, तात्यारावं शिंगारे यांनी अर्जुन वाकळेला उचलले. त्याला तब्यात घेत विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली देत प्रेयसींचे लाड पुरविण्यासाठी चोरी करत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी इतर दोन साथीदारांना अटक करत त्यांच्या ताब्यातून आठ लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत. नागरिकांनी आपल्या दुचाकीचे हॅन्डल लॉक व्यवस्थित आहे का पडताळून पाहावे व सार्वजनिक ठिकाणी दुचाकी उभी करताना तो लॉक केली आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे गजानन सोनटक्के यांनी केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tWyfTNK
No comments:
Post a Comment