मुंबई : देशातील सर्वांत मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) आशियाई विकास बँकेकडून (एडीबी) ४० कोटी डॉलरचा निधी देण्यात येणार असल्याचे समजते. या निधीतून ५,.१५० विद्युत बस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात एसटीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या वेळी शिंदे यांनी विद्युत बसच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. ‘कन्व्हर्जन एनर्जी सर्व्हिसेस लि.’ (सीईएसएल) या मॉडेलवर आधारित एसटीने निश्चित केलेल्या मार्गांवर विद्युत बस चालविण्यात येणार आहेत. एकाच वेळी मोठ्या संख्येने बस निविदा जाहीर केल्यास प्रति किमी दर कमी होईल. स्पर्धात्मक पद्धतीने कमी दराच्या निविदा आल्यानंतर एका कंपनीची निवड करण्यात येणार आहे. याचा फायदा महामंडळाला होणार आहे. या बसमध्ये चालक संबंधित कंपनीचा आणि वाहक एसटी महामंडळाचा असणार आहे. येत्या काही दिवसांत विद्युत बस ताफ्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वसामान्यांनादेखील वातानुकूलित एसटी प्रवास शक्य व्हावा, यासाठी विद्युत एसटी गाड्यांचे दर हा निमआराम बस श्रेणीप्रमाणे ठेवावेत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. अँड्रॉइडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे ऑनलाइन माध्यमातून प्रवाशांना तिकीट देणे, डिझेलवर धावणाऱ्या पाच हजार बसगाड्यांचे लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रूपांतरण करणे, लॉकडाउन काळातील परवाना शुल्कात एसटी स्टॉलना सवलत, नाशिक महापालिकेची शहर बस वाहतूक सुरू करणे आणि एसटीची जागा भाड्याने देणे, नवीन वेबसाइट विकसित करणे याबाबतच्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता देण्यात आली. तूर्त डिझेलवर मदार महामंडळात सध्या १७ हजार गाड्यांचा ताफा आहे. येत्या वर्षभरात यातील चार हजार गाड्यांचे आयुर्मान पूर्ण होणार आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी डिझेलवरील तीन हजार गाड्या जून २०२३अखेर महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ग्रामीण भागात सीएनजीच्या अनुपलब्धतेमुळे दोन हजार डिझेल बस घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे तूर्त एसटी महामंडळाची मदार डिझेल गाड्यांवर असेल. पहिल्या वाहकाला मदत एसटी महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ देण्याचा, तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशास मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केवटे यांचे वय ९८ वर्षे असून विशेष बाब म्हणून हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्त्याच्या दरात वाढ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली आहे. महामंडळाचे सुमारे ९२ हजार अधिकारी-कर्मचारी असून त्यांना पूर्वी मिळणारा २८ टक्के महागाई भत्ता आता ३४ टक्के दराने मिळणार आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची मासिक वाढ वेतनखर्चात होणार आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ या सहा वर्षांसाठीच्या वेतनसुधारणेच्या प्रस्तावास देखील यावेळी मंजुरी देण्यात आली. सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणाऱ्या अतिरिक्त उपदान मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त उपदान तथा कर्मचारी ठेव निगडित विमा योजनेंतर्गत आर्थिक लाभाची मर्यादा ६ लाख १५ हजारांवरून ७ लाख ५ हजार करण्यास या वेळी मान्यता देण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/luOqcKN
No comments:
Post a Comment