Breaking

Friday, November 25, 2022

'महाराष्ट्र टाइम्स'चा आजचा अग्रलेख : राष्ट्रवादाचा स्वर https://ift.tt/Ucr6ebG

राजधानीत ‘टाइम्स नाऊ समिट’ या टाइम्स वृत्तपत्रसमूहाच्या दूरचित्रवाणी वाहिनीने आयोजित केलेल्या परिषदेत देशाचे वर्तमान आणि भवितव्य यांच्या दृष्टीने सविस्तर विचारमंथन झाले. या परिषदेत गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले. मनीष तिवारी यांच्यासहित अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांनीही या परिषदेत महत्त्वाची मांडणी केली आहे. अमित शहा यांनी या परिषदेत छोटेसे मनोगत व्यक्त केले आणि नंतर सविस्तर मुलाखतही दिली. शहा यांच्या साऱ्या विवेचनाचा तसेच त्यांच्या मुलाखतीचा सारा भर आणि मुख्य स्वर नवभारताच्या राष्ट्रवादी विचारांचा होता. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७०हे कलम असो; भारतीय सैन्यदलांनी पश्चिम सीमा ओलांडून दोनदा केलेली धडक कारवाई असो; देशात एक ना एक दिवस समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्धार असो; की डाव्या विचारांच्या दहशतवादाचा बीमोड असो.. या साऱ्या विषयांच्या आग्रही उल्लेखांमधून एक निर्धार दिसत होता. अमित शहा हे आज केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठताक्रमानुसार कोणत्याही क्रमांकावर असले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे भाजप आणि सरकारमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते व मंत्री आहेत; हे स्पष्टच आहे. त्यामुळे, त्यांची विधाने आणि त्यांनी ठासून केलेले प्रतिपादन म्हणजे मोदी सरकारची भूमिकाच आहे. ‘भारताच्या साऱ्या शत्रूंना एक दिवस जबर किंमत मोजावी लागेल,’ हे शहा यांचे विधान केवळ भारताच्या पश्चिम सीमेकडे पाहून केलेले नाही. या विधानाची योग्य ती दखल जगात घेतली गेली असणार. ‘टाइम्स समूहा’चे व्हाइस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर समीर जैन यांनी या परिषदेत ‘महा अखंड भारत’ ही जी संकल्पना मांडली, तिची याच दृष्टिकोनातून दखल घ्यायला हवी. जैन यांनी मांडलेली ‘महा अखंड भारत’ ही संकल्पना मुख्यत: सांस्कृतिक आहे आणि तिच्यामध्ये भारताच्या सांस्कृतिक प्रभावाचा आणि भारतीय संस्कृतीने जपलेल्या चिरंतन मानवी मूल्यांचा संदर्भ अनुस्यूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ‘आता युद्धाचे दिवस राहिलेले नाहीत,’ असे सांगितले होते. याचा संदर्भ देताना समीर जैन यांनी ‘शांती हाच पथ आहे’ हा भारतीय विचार पंतप्रधानांना अधोरेखित करायचा होता, हे लक्षात आणून दिले. अमित शहा आणि समीर जैन यांच्या वक्तव्यांना जोडणारा धागा भारत हा राष्ट्र म्हणून समर्थ, शक्तिमान आणि आत्मनिर्भर असण्याचा आहे. भारत हा कधीही कुणावर आक्रमण करीत नाही; हे विधान सत्य असले तरी ते अपुरे आहे. भारत कधीही कुणावर हल्ला करणार नाही आणि कुणाला भारताची शांतताप्रियता गृहित धरून हल्ला करूही देणार नाही, हे भारताच्या भूमिकेचे परिपूर्ण सत्य विधान आहे. गृहमंत्र्यांच्या भाषण आणि मुलाखतीमधून ते मांडले जात होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० हे कलम गेल्यापासून उलट काश्मीरमधील हिंसाचार आणि दहशतवाद कमी झाल्याचे शहा यांनी आकडेवारीतून दाखवून दिले. त्यांनी पर्यटकांचा विक्रमी आकडाही सुखावणारा होता. काश्मीरमध्ये रस्त्यावर उतरून होणारी दगडफेक तर इतिहासजमा झाली आहे, हे शहा यांचे विधान वृत्तवाहिन्या पाहणाऱ्या कुणालाही पटण्याजोगे होते. दहशतवाद आणि फुटिरतावादाचा खंबीर सामना हाच शांतिपथावरचा दीर्घकालीन प्रवास असू शकतो. शहा यांनी ईशान्य भारताचा केलेला उल्लेख महत्त्वाचा होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा हे एका राज्याचे मुख्यमंत्री असले तरी भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आठही राज्यांचा नेता म्हणून पाहतो. येत्या दशकभरात ईशान्येतील राज्ये हे भारताच्या विकासाचे इंजिन झालेले असेल, हे सर्मा यांचे याच परिषदेतील वक्तव्य ईशान्येच्या नव्या प्रवासाची खूणगाठ पटविणारे होते. ईशान्य भारत हा देशाच्या मुख्य प्रवाहात कधी येणार, हा प्रश्न अनेकदा विचारला जात होता. अमित शहा यांनी मोदी सरकारच्या आठ वर्षांतील महत्त्वाच्या कामांमध्ये ‘ईशान्य भारतातील विकास’ याचा खास उल्लेख केला. ईशान्य भारत हा भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीनेही किती महत्त्वाचा आहे, हे वेगळे सांगायला नको. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी सर्वप्रथम ईशान्य भारतासाठी केंद्रात वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली होती. तो प्रवास नेटाने पुढे चालू ठेवणे, हे महत्त्वाचे होते. पंतप्रधान मोदी हे नेहमी भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीचा उल्लेख करीत असतात. अमित शहा यांनी तोच उल्लेख या परिषदेत केला. गेल्या सात दशकांमध्ये सर्वच पक्षांच्या सत्ताधाऱ्यांनी आणि सरकारांनी भारतीय लोकशाहीची जी जपणूक केली; आर्थिक आव्हाने पेलली, त्यातून हे स्वातंत्र्याच्या शताब्दीचे स्वप्न साकारणार आहे. या प्रदीर्घ वाटचालीमधून साकारलेला, प्रकटणारा भारतीय राष्ट्रवादाचा हा स्वर साऱ्या भारताचा आहे. तो पक्षीय राजकारण ओलांडून जाणारा आहे. तो जपत पुढे जावे लागेल, हाच या परिषदेचा संदेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7mwAFep

No comments:

Post a Comment