म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारच्या आदेशानंतर 'कॅग'ने मुंबई महापालिकेतील गेल्या दोन वर्षांतील १२ हजार कोटी रुपयांच्या कामांची चौकशी सुरू केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून 'कॅग'च्या पाच पथकांनी चौकशीची व्याप्ती वाढवताना काही विभाग कार्यालयांवरही लक्ष केंद्रीत केल्याचे सांगण्यात येते. करोना कालावधीत ज्या विभाग कार्यालयांच्या हद्दीत करोना केंद्रे उभारण्यात आली, त्या कार्यालयांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. 'कॅग'च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांचीही भेट घेतली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार 'कॅग'च्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी मुंबईतील विभाग कार्यालयांनाही भेटी दिल्या. करोना कालावधीत या विभाग कार्यालयांमार्फत झालेल्या खर्चाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीमुळे मुंबई पालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत. 'कॅग'च्या पथकांकडून प्रामुख्याने जम्बो करोना केंद्रे ज्या विभागांत उभारण्यात आली, तेथील चौकशीची तीव्रता वाढवली आहे. लेखा परीक्षकांकडून केल्या गेलेल्या लेखा परीक्षणाचीही चाचपणी व अभ्यास केला जात आहे. करोना कालावधीत परदेशातून मुंबईत आलेल्यांची काही कालावधीसाठी मुंबई हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 'कॅग'कडून संबंधित प्रवाशांची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे. या सर्व परिस्थितीत करोना कालावधीत अपवादात्मक परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कामे करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तत्कालीन परिस्थितीत मनुष्यबळ उपलब्ध होण्यासह विविध अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव असूनही लोकांची काळजी वाहिल्याचे म्हणणे काही कर्मचाऱ्यांनी मांडले आहे. मात्र, आता त्याच कामांच्या चौकशीस सामोरे जावे लागत असल्याची कैफियत अधिकाऱ्यांनी मांडली आहे. 'चौकशी व्हायलाच हवी' 'मुंबई पालिकेने करोना कालावधीत केलेल्या कामांची चौकशी झालीच पाहिजे', अशी प्रतिक्रिया मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे. 'यापूर्वीही आपण वारंवार अशा चौकशीची मागणी केली होती. तेव्हा त्याबाबत निर्णय झाला नाही. पण आता सुरू झालेल्या चौकशीचा निर्णय योग्य आहे व त्यातून सत्य बाहेर येईल', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HQlrPeW
No comments:
Post a Comment