Breaking

Wednesday, December 21, 2022

नव्या व्हेरियंटमुळं टेन्शन, राज्य सरकारने उचलली गंभीर पावलं, कृतिगट स्थापन करणार https://ift.tt/6zPU2It

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरः जगात अनेक देशांमध्ये पुन्हा करोनाची लाट वेगाने पसरत असून, त्याचे पडसाद बुधवारी विधानसभेतही उमटले. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्यात करोनासंदर्भात कृतिगट स्थापन करण्यात येईल, तसेच या गटाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत करोनाच्या वाढत्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली. 'आपण तसेच संपूर्ण जगाने नुकताच करोना संकटाचा सामना केला. आता चीन, अमेरिका आदी देशांत हा आजार पुन्हा डोके वर काढत आहे. केंद्र सरकारने २० डिसेंबरला यासंदर्भात बैठक घेऊन राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आपल्या राज्यालाही सूचना आल्या असतील. त्यामुळे राज्य सरकारने यावर तत्काळ उपाययोजना करावी', अशी मागणी पवार यांनी केली. तसेच, राजकारण बाजूला ठेवून करोनाविरोधात सर्व पक्ष मिळून काम करू असेही ते म्हणाले. त्यावर फडणवीस यांनी कृतिगट स्थापन करणार असल्याची माहिती दिली. वैद्यकीय सज्जतेची मागणी चीनमध्ये पुन्हा झालेला करोनाचा उद्रेक व अन्य देशांमध्ये वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट यांसारखी वैद्यकीय साधने आणि आवश्यक औषधांचा साठा सज्ज ठेवावा, अशी मागणी राज्यातील औषधवितरकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. करोनाविरोधातील लढ्यात आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य, उपकरणे आणि औषधे सज्ज ठेवल्यास आणीबाणी निर्माण होणार नाही. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करणे शक्य होईल, असे 'ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्सहोल्डर फाऊंडेशन'चे अध्यक्ष अभय पांडे यांनी पत्राद्वारे केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WeSQbO

No comments:

Post a Comment