म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः कोकण विभाग वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंतही काही ठिकाणी खाली उतरल्याची नोंद झाली. मंगळवारपासून राज्यातील या भागांमध्ये थंडीची जाणीव पुन्हा एकदा होईल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ते वायव्य पट्ट्यातून वाऱ्यांची दिशा असेल. याचा परिणाम राज्यातही होऊ शकेल. राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी २ ते २.५ अंशांपासून ४ अंशांपर्यंत किमान तापमानात घट झाली होती. यवतमाळमध्ये ५ अंशांनी तापमान उतरून १०.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथेही २४ तासांमध्ये ४.२ अंशांनी तापमान कमी झाले. येथे १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. अकोला, अमरावती, बुलढाणा येथे सोमवारी २ ते २.५ अंशांदरम्यान पारा खाली उतरला. मराठवाड्यातही किमान तापमानात २४ तासांत मोठी घट नोंदली गेली. नांदेड येथे ५, परभणी ४.५, तर उद्गीर येथे ५.२ अंशांनी किमान तापमानात घट झाली. यातील काही केंद्रांवर तापमान सोमवारीही सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक होते. मात्र मंगळवारपासून हा फरकही कमी होईल, असा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे रविवारपेक्षा सोमवारी किमान तापमान ४.२ अंशांनी घसरले. पुणे येथे ३, नाशिक येथे २.७, सांगली येथे २.५ अंशांनी किमान तापमान कमी झाले. कोकण विभागात मात्र किमान तापमान फारसे घसरलेले नाही. डहाणू येथे रविवारपेक्षा १.२ अंशाने, तर कुलाबा येथे एक अंशाने तापमान खाली उतरले. मात्र कोकण विभागात किमान तापमान अजूनही २१ अंशांच्या पुढे आहे. कुलाबा येथे सोमवारी २३.८ आणि सांताक्रूझ येथे २२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सोमवारी दिवसभरही वातावरणात उकाडा कायम जाणवत होता. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर अजूनही ३३च्या पुढे आहे. २५ डिसेंबरपर्यंत मुंबईत कमाल तापमान ३३ अंशांच्या आसपास, तर किमान तापमान २१ अंशांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाच्या परिणामामुळे तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम नाही तापमानात आणखी घसरण होऊन थंडी पुन्हा जाणवण्याची शक्यता आहे, असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. केवळ किमानच नाही, तर कोकण विभाग वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानातही घट होऊ शकते. बंगालच्या उपसागरातील तमिळनाडूच्या दिशेने प्रवास करणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यातील थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २० ते ३१ डिसेंबर या काळात राज्यात पावसाची शक्यताही नाही, असे ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/khQqIE9
No comments:
Post a Comment