Breaking

Friday, December 9, 2022

महाराष्ट्रासाठी सीमावर्ती गावातील स्थिती ही भूषणावह नाही!, रामदास आठवलेंचा मविआवर हल्लाबोल https://ift.tt/hJS0oGb

ठाणे : महाराष्ट्रातल्या गावांना दुसऱ्या राज्यात जावंसं वाटणं, ही महाराष्ट्रासाठी भूषणावह परिस्थिती नसून मागच्या सरकारांनी सीमावर्ती भागाकडे दुर्लक्ष केल्यानं हा असंतोष वाढल्याचं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. आठवले हे आज एका कार्यक्रमासाठी कल्याणमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर परखड मतं व्यक्त केली. मराठी भाषिकांना महाराष्ट्रात घ्यावं ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होईलच. पण अलीकडे महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळत असून कुणी कर्नाटकमध्ये, कुणी तेलंगणामध्ये, तर कुणी आम्हाला गुजरातमध्ये जायचं असल्याचं म्हणत आहेत. ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी फारशी भूषणावह नाही. या सीमावर्ती लोकांकडे अनेक वर्ष लक्ष दिलं गेलं नाही. त्यांना प्यायला पाणी मिळत नाही. यापूर्वीच्या सरकारनं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. पण शिंदे फडणवीस सरकारनं या भागासाठी २ हजार कोटींची घोषणा केली आहे. म्हैसाळ योजनेतून या गावांना पाणी मिळणार असून या भागाचा विकास होणं महत्त्वाचं आहे. या लोकांना इंडस्ट्रीज, शेती आणि पिण्यासाठी पाणी, रोजगार देणं गरजेचं आहे, असं आठवले म्हणाले. या गावांकडे सरकारनं विशेष लक्ष द्यावं, अशी मागणी मी सरकारकडे करणार असून कुठल्याही गावानं हतबल होऊन आपल्याला सोडून जाऊ नये, याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. उद्योग बाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आपल्या राज्यातले बहुतांशी उद्योग महाविकास आघाडीच्या काळात बाहेर गेले. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली. उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करून सुविधा देणं गरजेचं आहे. यासाठी शिंदे फडणवीस सरकार नक्कीच प्रयत्न करेल. आता आम्ही प्रधानमंत्र्यांना भेटून जे उद्योग राज्याबाहेर गेले, त्याच्या बदल्यात आम्हाला काही उद्योग मिळावेत, अशी मागणी करणार आहोत, असं आठवले म्हणाले. महापुरुषांचा सन्मान राखणं महत्त्वाचं.. राज्यपालांचा निर्णय राष्ट्रपती घेतील! छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणाकडूनही उलटसुलट वक्तव्य होता कामा नये. शिवाजी महाराज हे त्यावेळचे तर आदर्श होतेच, पण आजचेही महाआदर्श आहेत, असं रामदास आठवले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकरण करणारे सगळेच पक्ष आहेत. त्यामुळे महापुरुषांबद्दल अशी भूमिका घेणं योग्य नाही. राज्यपालांच्या विरोधात असंतोष असून त्याबाबत काय निर्णय घ्यायचा हा अधिकार राष्ट्रपतींचा आहे. त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं रामदास आठवले म्हणाले. शिवसेनेत नेत्यांची कमी असल्यानं सुषमा अंधारेंना आणलं! सुषमा अंधारे या सातत्यानं शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असल्याबाबत आठवले यांना विचारलं असता, सुषमा अंधारेंना शिवसेनेनं टीका करण्यासाठीच आणलं आहे, असं आठवले म्हणाले. अंधारे या आमच्याही पक्षात काही वर्ष होत्या. पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे, त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे, असा टोला आठवलेंनी लगावला. शिवसेना-वंचित एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही! यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत असल्याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले तरी काही फारसा फरक पडणार नसून भीमशक्ती माझ्यासोबतच असल्याचा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. शिवशक्ती - भीमशक्तीचा प्रयोग बाळासाहेब ठाकरे आणि मी एकत्र आल्यानंतर झाला होता. त्यावेळी आम्ही मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणूकही जिंकली होती. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याचा अधिकार आहे, त्यांनी एकत्र यावं, पण याचा फारसा परिणाम महायुतीवर होणार नाही. मी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची महायुती भक्कम आहे, त्यामुळे यावेळी मुंबईवर आमचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. ज्यांना कुणाला एकत्र यायचं असेल त्यांनी यावं, पण आमची ताकद मोठी आहे, आम्ही त्यांना थकवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानच यावेळी रामदास आठवले यांनी दिलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LB5cAf4

No comments:

Post a Comment