मुंबई : देशातील पहिली बुलेट ट्रेन असणाऱ्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या नियोजित मार्गात अडथळा ठरत असलेल्या खारफुटीच्या सुमारे २२ हजार झुडपांची कत्तल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) या कंपनीला सशर्त परवानगी दिली. 'खारफुटी तोडण्याच्या बदल्यात पर्यावरण जतनाच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) घालून दिलेल्या अटी व शर्तींचे कंपनीला पूर्णपणे पालन करावे लागेल', असे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल अॅक्शन ग्रुपच्या (बीईएजी) सन २००६मधील जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक हिताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणांखाली कांदळवनात (खारफुटी क्षेत्रात) बांधकाम करण्यास मनाई आहे. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक हिताच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत परवानगी मिळावी, यासाठी कंपनीने अॅड. प्रल्हाद परांजपे यांच्यामार्फत तीन वर्षांपूर्वी रिट याचिका केली होती. ही याचिका प्रलंबित असतानाच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिक खारफुटींचे रक्षण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या आराखड्यात बदल करण्याचे निर्देश २९ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्या अनुषंगाने नियोजित मार्गात बदल केल्यानंतर कंपनीने याचिकेत दुरुस्ती करून न्यायालयाची परवानगी मागितली होती. 'महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून पुढे गुजरातमधील अहमदाबादपर्यंत ५०८ किमी अंतरावर धावणारी ही बुलेट ट्रेन सार्वजनिक हितासाठीच आहे. त्यामुळे ठराविक प्रमाणात खारफुटींचे नुकसान होत असले, तरी विकासाचा प्रकल्प म्हणून परवानगी मिळणे आवश्यक आहे. या प्रकल्पाला अन्य संबंधित सर्व प्राधिकरणांनी मंजुरी दिली असून उच्च न्यायालयानेही मंजुरी द्यावी. पूर्वी ५३ हजार ४६७ खारफुटींची झुडपे बाधित होत असताना आता २१ हजार ९९७ झाडे बाधित होणार आहेत. बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल करून ठाणे व विरार ही दोन स्थानके खारफुटी क्षेत्राऐवजी काही अंतरावर प्रस्तावित केली असल्याने बाधित खारफुटींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शिवाय पर्यावरण जतन अटीप्रमाणे कंपनीकडून पाच पट प्रमाणात खारफुटीची झुडपे अन्यत्र लावण्यात येतील', असे कंपनीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. 'खारफुटीची झुडपे तोडल्यास त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही', असे निदर्शनास आणत बीईएजीने कंपनीच्या याचिकेला तीव्र विरोध दर्शवला होता. अखेरीस दोन्ही बाजू तपासल्यानंतर १ डिसेंबर रोजी राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर करताना खंडपीठाने कंपनीला सशर्त परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णयाची प्रत नंतर उपलब्ध होणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्ये -एकूण ५०८ किमी मार्गावर १२ स्थानके -बुलेट ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावणार -गर्दीच्या वेळेत दर २० मिनिटांनी आणि अन्य वेळेत दर ३० मिनिटांनी ट्रेन धावणार -दिवसाला ट्रेनच्या एकूण ३५ फेऱ्या होणार -मुंबई ते अहमदाबाद अंतर तीन तासांत कापले जाणार
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qeg7VKG
No comments:
Post a Comment