वृत्तसंस्था, नवी दिल्लीः नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अन्यत्र स्थायिक झालेल्या मतदारांना त्या शहरातूनच मूळ गावी मतदान करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे इतरत्र काम करणाऱ्या चाकरमान्यांना अन्य शहरातूनही त्यांच्या मूळ गावी मतदान करता येईल. निवडणूक आयोगाने यासाठी एक विशेष प्रारूप दूरस्थ ईव्हीएम (ई-मतदान यंत्र) विकसित केले आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या अन्य भागांत स्थायिक होणाऱ्या मतदारांच्या सुविधेसाठी हे यंत्र प्रामुख्याने विकसित करण्यात आले असून राजकीय पक्षांना येत्या १६ जानेवारीस त्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे, असे आयोगाने म्हटले आहे. ‘दूरवरच्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची मोजणी करणे तसेच, ही माहिती अन्य राज्यांतील निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक आव्हान आहे. त्यामुळे यावर मात करणे व मतदारांचा सहभाग वाढवणे या हेतूने हे नवे प्रारूप यंत्र विकसित करण्यात आले आहे. सध्या वापरात असणाऱ्या ईव्हीएमच्या धर्तीवरच असणारे हे यंत्र अतिशय सक्षम, त्रुटीविरहित असेल व त्याची इंटरनेटला जोडणी केली जाणार नाही,’ अशी माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, संबंधित अन्य घटकांचे अभिप्राय व या यंत्राचे सादरीकरण यानंतर या यंत्राचा वापर करण्याविषयीची प्रक्रिया सुरू होईल, असे आयोगाच्या पत्रकात म्हटले आहे. या यंत्राची माहिती देणारी एक सविस्तर टीप आयोगाने राजकीय पक्षांकडे पाठवली असून या यंत्राच्या वापराविषयीच्या कायदेशीर, प्रशासकीय व तंत्रज्ञानात्मक आव्हानांवर त्यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून या यंत्राच्या कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात येणार असून त्याासाठी आयोगाने मान्यताप्राप्त आठ राष्ट्रीय पक्ष व राज्यस्तरावरील ५७ राजकीय पक्षांना १६ जानेवारीस आमंत्रित केले आहे. या यंत्राविषयीच्या सूचना, शंका, अभिप्राय, अपेक्षित बदल आदी ३१ जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्याचे निर्देशही आयोगाने या पक्षांना दिले आहेत. या यंत्राच्या साह्याने केवळ एका दूरस्थ ईव्हीएम केंद्राद्वारे जास्तीत जास्त ७२ मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संचालित करता येईल, असे आयोगाने म्हटले आहे. मतदानातील निरुत्साह तसेच, अन्य शहरांत स्थायिक झालेल्या मतदारांपुढील अडचणी याचा विचार करता हे यंत्र क्रांतिकारी ठरेल. या यंत्रामुळे नागरिकांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढीस लागेल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केला. हे सामाजिक परिवर्तन ठरेल... अनेक मतदारांना नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्याची ठिकाणे वरचेवर बदलावी लागत असल्याने मतदार म्हणून मूळ गावी असणारी नोंद ते कायम ठेवतात. हे मतदार आपल्या मूळ गावच्या राजकीय-सामाजिक विषयांशीही अधिक जोडले गेलेले असतात. त्यामुळेही ते तेथील मतदारयादीतील आपले नाव कमी करत नाहीत. परंतु दरवेळी मूळ गावी जाऊन मतदान करणेही त्यांना शक्य नसते. त्यामुळे या प्रकारचे यंत्र वापरात आले तर ते मोठे सामाजित परिवर्तन ठरेल, असे आयोगाने म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vbdZLaD
No comments:
Post a Comment