म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः नववर्षाचे स्वागत यंदा करोना प्रतिबंधाच्या कोणत्याही निर्बंधांविना करता येणार असल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घातपात, छेडछाड तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडेल, असे काही घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. ३१ डिसेंबरला म्हणजेच शनिवारी सायंकाळपासून मुंबईत सुमारे बारा हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. करोनामुळे लागू झालेल्या प्रतिबंधांनी २०२० मध्ये मुंबईकरांची वाट अडवली होती. २०२१मध्ये निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले होते. मात्र रात्रीची संचारबंदी होती. मुंबईतील चौपाट्या आणि समुद्रकिनारे रात्री ११च्या आधीच निर्मनुष्य करण्यात आले होते. यंदा करोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असला तरी सेलिब्रेशनवर कोणतेही निर्बंध अद्याप लादण्यात आले नाही. हॉटेल, बार, दुकाने पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर, समुद्रकिनारे, चौपाट्या, मैदाने या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शिस्तीत, शांततेत आणि नियमांचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत करा, असे आवाहन पोलिसांनी केली आहे. समाजकंटकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेष शाखा, गुन्हे शाखेच्या पथकांना सतर्क ठेवण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची विशेषतः महिला पोलिसांची साध्या वेशात गस्त असेल. कुठेही संशयास्पद वस्तू किंवा हालचाली दिसल्यास १०० क्रमांक किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. असा असेल बंदोबस्त २५ पोलिस उपायुक्त सात अतिरिक्त आयुक्त दीड हजार अधिकारी दहा हजार अंमलदार एसआरपीएफच्या ४६ तुकड्या शीघ्र कृती दलाची १५ पथके तळीरामांविरोधात मोहीम करोनाच्या संसर्गामुळे थंडावलेली ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी मोहीम यंदा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आणि यासाठी पुन्हा ब्रेथ अॅनालायझरचा वापर करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने मुंबईत सुमारे १०० ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी चालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आकाशकंदील, फटाक्यांवर बंदी मुंबईत गर्दीच्या ठिकाणी, समुद्र किनारी तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. परवानगीविना ड्रोन, आकाशकंदील उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. दहशतवाद आणि घातपातच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/S3VKZWd
No comments:
Post a Comment