म. टा. प्रतिनिधी, मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शनिवारी मुंबईसह उपनगरांमधील महत्त्वाची ठिकाणे अक्षरशः गर्दीने फुलून गेली होती. नागरिक मोठ्या संख्येने किनारपट्ट्या, हॉटेल, रेस्तराँ, रिसॉर्टमध्ये दाखल झाले होते. करोनाचे सावट दूर झाल्याने लोक मुक्त वातावरणात मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांच्या सोबत नववर्षाचा जल्लोष साजरा करत होते. गेटवे ऑफ इंडियावरही नागरिकांच्या उत्साहा उधाण आले होते. उत्सवाच्या या वातावरणात पालिकेने राषणाईने उजळवलेले रस्ते जल्लोषात अधिकच भर घालत होते. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार झाले होते. करोनाचे सावट दूर झाल्याने मागील काही महिन्यांपासून सर्वत्र पुन्हा एकदा गर्दी होताना दिसत आहे. शनिवारी '२०२२'ला निरोप देण्यासाठीही मुंबई महानगर प्रदेशातील नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. गेटवे ऑफ इंडिया येथे अनेकजण कुटुंबासह दाखल झाले होते. काहींनी घरून खाऊ बनवून आणला होता. कुटुंबासह बसून ते गेटवे परिसरात या पदार्थांचा आस्वाद घेत होते. नरिमन पॉइंट आणि मरिन ड्राइव्हला तरुणाई मोठ्या संख्येने जमली होती. अनेकजण मित्र मैत्रिणींसह वाद्यांच्या तालावर गाणी म्हणून गतवर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करत होते. मुंबईत गिरगाव चौपाटी, बँडस्टँड, जुहू चौपाटी, गोराई या किनाऱ्यांवरही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. या गर्दीमुळे गेटवे ऑफ इंडिया येथे ताज हॉटेलसमोरील पदपथही पर्यटकांनी भरून गेला होता. किनारपट्ट्या आणि पर्यटनस्थळांबरोबरच मॉल, रेस्तराँ या ठिकाणीही अनेकांनी कुटुंबासह हजेरी लावली होती. मुंबईतील बहुतांश मॉलमध्ये खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र होते. वरळीतील एका मॉलबाहेर प्रवेशासाठी रांग लागल्याचे चित्र होते. मॉलमध्येही नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केल्याचे दिसत होते. रेस्तराँमध्येही अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पर्यटनस्थळांच्या नजीकची रेस्तराँमध्ये भरपूर गर्दी होती. दक्षिण मुंबईत भटकंतीसाठी आलेल्या बहुतांश जणांकडून पालिकेसमोरील पर्यटक गॅलरीत उभे राहून छायाचित्रे काढली जात होती. सीएसएमटी स्थानकाच्या रोषणाईचा फोटो काढण्यासाठी या गॅलरीत झुंबड उडाली होती. सर्वत्र पर्यटकांची गर्दी असल्याने शहरात जागोजागी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी गेटवे ऑफ इंडिया येथे कुटुंबासह आलेल्यांसाठी स्वंतत्र व्यवस्था केली होती. गेटवेचा अर्धा भाग पडदे लावून पोलिसांनी संरक्षित केला होता. त्यातील एका बाजूला केवळ कुटुंबासह आलेल्यांना सोडले जात होते. मरिन ड्राइव्हवरही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठाराविक अंतरावर पोलिस तैनात होते. तसेच प्रत्येक सिग्नलला वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचे दिसत होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RSObITA
No comments:
Post a Comment