म. टा. प्रतिनिधी, मुंबईः यंदाच्या वर्षातील आज शेवटचा रविवार आहे. लांबचा प्रवास शक्य नसलेल्या नागरिकांचा शहरातील समुद्रकिनारी ओढा आहे. अशावेळी लोकल तिकीट प्रक्रियेमुळे प्रवास वेळखाऊ होत आहे. यूटीएस अॅपमधून वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणी प्रवासासाठी कमाल तिकिटे घेण्यावर बंधने लादण्यात आली आहेत. या श्रेणीचे एकावेळी एकच तिकीट काढता येत असल्याने प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नववर्षाचे आगमन आणि नाताळच्या सुट्टीमुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांचे वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीमधून प्रवास करण्याला प्राधान्य आहे. मात्र एक तिकीट काढल्यानंतर दुसऱ्या तिकिटांसाठी १० मिनिटे थांबावे लागत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर तक्रार मांडली आहे. यूटीएसमधून सध्या लोकलच्या द्वितीय श्रेणी प्रवासासाठी किमान एक, तर कमाल चार तिकीट निघतात. मात्र प्रथम श्रेणी आणि एसी लोकलमध्ये कमाल चार तिकिटे निघत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा विषय 'महाराष्ट्र टाइम्स'ने मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्याकडे मांडला होता. याबाबत रेल्वे सूचना प्रणाली केंद्राकडे (क्रिस) पत्रव्यवहार केल्याची माहिती गोयल यांनी दिली. त्यानंतर वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीसाठी कमाल तिकिटे चार दाखवण्यास सुरुवात झाली. मात्र तिकीट बूक करताना ‘एकावेळी एकच तिकीट घेता येईल’, असा संदेश अॅपमध्ये झळकत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. कमी वेळेत तिकीट उपलब्ध व्हावे आणि तिकिटांसाठी खोळंबा होऊ नये, यासाठी आहे. वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या कमाल बंधनामुळे चार तिकिटांसाठी ४० मिनिटे थांबावे लागत आहे. यामुळे मूळ हेतूलाच तडा जात असल्याचे आयटी क्षेत्रात काम करणारा यूटीएस अॅपवापरकर्ता अरुण गोसावी याने सांगितले. ‘स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील रांग टाळण्यासाठी यूटीएस अॅपचा वापर सुरू झाला. यातून एकटीचा पास-तिकीट सहज घेता येते. मात्र परिवारासह एकत्र प्रवास करताना अडचण होते. वेगवेगळे तिकीट आणि एकत्र तिकीट पैसे भरूनच मिळणार असतील मग हे बंधन कशासाठी’, असा प्रश्न सरकारी बँकेत काम करणाऱ्या सीमा देशमुख यांनी उपस्थित केला. पाठपुरावा करू! ‘यूटीएस अॅपचे संचलन ‘क्रिस’कडून करण्यात येते. यात बदल करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलमधील कमाल तिकीट बंधने शिथिल करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे”, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/a0jpSvA
No comments:
Post a Comment