नाशिक: देवळा मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावाने त्याच्या माजी सैनिक असलेला भाऊ, भावजय आणि पुतणीला बेदम मारहाण केली. या घटनेप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा येथील मालेगांव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून शेतामध्ये सख्खा भाऊ संजय रतन लोखंडे त्याची पत्नी मनीषा, मुलगा सागर आणि प्रेम यांनी फिर्यादी मांगु रतन लोखंडे आणि त्याची पत्नी कल्पना तसेच, मुलगी माधुरी यांना आज शनिवारी २१ जानेवारी रोजी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत मांगु लोखंडे आणि त्यांची पत्नी, मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथे देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांची घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करण्याऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भांदवी कलम ३०७, ३२६, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्योती गोसावी, सहायक फौजदार देवरे ,पोलीस हवालदार निकम अधिक तपास करत आहेत. शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेवरुन सख्खा भाऊ पक्का वैरी अशी म्हणायची वेळ आली आहे. दरम्यान, गंभीर जखमी मांगु लोखंडे हे देवळा तालुक्यातील आजी-माजी सैनिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह पत्नी तसेच मुलीवर त्यांच्या सख्ख्या भाऊ आणि भावाचे मुलं आणि भावाची पत्नी यांनी सर्वांनी मिळून कुऱ्हाड, कोयता आणि लोखंडी सळई अशा तीक्ष्ण धारदार हत्यारांनी अतिशय जीवघेणा प्राणघातक हल्ला झाल्याचा घटनेचा आजी माजी सैनिक संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जनसंपर्क अध्यक्ष प्रवीण बोरसे यांनी सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/H0he9BM
No comments:
Post a Comment