रत्नागिरी: देवरुख नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार कॉम्प्लेक्समधील तब्बल सहा बंगले चोरट्यांनी रविवारी रात्री फोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन बंगल्यातील मिळून ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर चार बंगल्यांमध्ये या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. एकाच रात्री तब्बल सहा बंगले चोरट्यांनी फोडल्याने साडवलीसह देवरुख परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत देवरुख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश महादेव लिंगायत यांच्या घरातून अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याच्या दोन बांगड्या आणि सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज तर अर्चना चंद्रकांत डोंगरे यांच्या घरातील २० हजार रुपये किमतीचे चार ग्रँम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चोरट्यांनी लांबविले. तर याच कॉम्प्लेक्समधील आणखी चार बंगले फोडण्याचा या चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती या बंगल्यातून काहीच लागले नाही.एकाच रात्री तब्बल सहा बंगले चोरट्यांनी फोडल्याची देवरुख पोलिसांना सोमवारी सकाळी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार डी. एस. पवार, हे. कॉ. प्रशांत मसुरकर, पोलीस कॉन्स्टेबल वैभव नटे, पो. कॉ. रोहित यादव यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यामध्ये चार बंगल्यांमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर दोन बंगल्यांमधून एकूण ९३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले आहे.दरम्यान, या चोरीचा छडा लावण्यासाठी देवरुख पोलिसांनी रत्नागिरीतून श्वान पथक, ठसेतज्ञ आणि फॉरेंन्सिक टीमला पाचारण केले होते. याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली आहे. या चोरीच्या घटनेची नोंद देवरुख पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eEldDFi
No comments:
Post a Comment