अकोला : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. श्रीकांत संजय राऊत असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीकांतचा मृतदेह आज अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव जवळ एका नाल्यामध्ये तरंगताना आढळून आला. त्याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षा देत असताना श्रीकांत राऊत हा सेंट्रल बँकेत नोकरीवर रुजू झाला होता. मात्र कलेक्टर व्हायचं स्वप्न असल्याने त्याने नोकरीचा राजीनामा दिलेला होता.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत संजय राऊत (वय ३० राहणार पटवारी कॉलनी, ता. मूर्तिजापुर, जि. अकोला.) हा स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. श्रीकांत स्पर्धा परीक्षा देत असताना सेंट्रल बँकेत त्याची एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली होती. परंतु श्रीकांत याचा सख्खा चुलत भाऊ आयएएस अधिकारी असल्याने त्यालाही आयएएस अधिकारी व्हायचं होतं. यासाठी त्याने सेंट्रल बँकेतील पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर श्रीकांतने मुर्तीजापूर शहरातच दोन वेगवेगळ्या ग्रंथालयात एमपीएससी-यूपीसीएसची तयारी सुरू केली. त्याचं मुख्य टार्गेट कलेक्टर व्हायचं होतं. यासाठी तो प्रत्येक स्पर्धा परीक्षाचा सराव करायचा, अन् ज्या विभागात जागा निघतील त्याची परीक्षाही द्यायचा. हल्लीच त्याने एमपीएससीची परीक्षा देत त्यात चांगले गुणही मिळवले. तसेच त्याची मुलाखत मुंबई इथे घेण्यात आली. मात्र परीक्षेचा अंतिम निकाल हाती याअगोदरच श्रीकांत याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे श्रीकांत घरून आज सकाळी नऊ वाजता अभ्यासासाठी ग्रंथालयात जातो, असं सांगून निघाला होता. त्यानंतर दुपारी दीड वाजता कुटुंबीयांना श्रीकांतच्या मृत्यूची बातमी समजली. दरम्यान श्रीकांतचा मृतदेह आज बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव फाट्या जवळ असलेल्या इंजिनीयर कॉलेजच्या पाठीमागे एका नाल्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लागलीच घटनास्थळ गाठले, आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. ज्या ठिकाणी श्रीकांतचा मृतदेह मिळून आला तिथेच त्याची बॅग सापडली. या बॅगमध्ये त्याचे सराव परीक्षेचे पुस्तक, तसेच एक पांढऱ्या रंगाची बॉटल सापडली. त्यामध्ये विषारी औषध असल्याचा पोलिसांना संशय आहे. श्रीकांतने विषारी औषध प्राशन करूनच आत्महत्या केली असावी, असाही पोलिसांना संशय आहे. यासाठी वैद्यकीय तपासणी करिता अकोल्यातील शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला. शवविच्छेदन प्रक्रियेनंतर त्याच्यावर आज मूर्तिजापूर शहरात अंतिमसंस्कार पार पडला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Lld9PVO
No comments:
Post a Comment