सातारा: सातारा नगरपालिकेचा माजी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याला शहर पोलिसांनी अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी तालीम संघ येथे सनी भोसले याला पिस्टल दाखवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी सांगितले की, बाळू खंदारे याच्यासह सुमारे १५ जणांविरुध्द प्राणघातक हल्ला, आर्म अॅक्ट अन्वये ८ सप्टेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. सनी भोसले हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. सनी भोसले हे सहकार्यांसोबत तालीम संघावरून जात असताना एका कारमधील काही युवकांनी बाळू खंदारे याच्या कार्यालयाकडे पाहून शिवीगाळ केली. यावरून बाळू याने सनी याला फोन करून त्याचा जाब विचारत तालीम संघावर बोलावले. यातूनच बाळू खंदारे याच्या साथीदारांनी बंदूकीचा धाक दाखवत सनी भोसले याच्या सहकार्यांना मारहाण केली.या घटनेनंतर सातारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांची उचलबांगडी केली, तर अनेकजण पसार झाले. बाळू खंदारे याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, तो अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. यामुळे गेली दीड वर्षे अटकपूर्व जामिनाचे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मात्र उच्च न्यायालयानेही बाळू खंदारे याचा जामीन अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयात जाणे किंवा पोलिसांना शरण जाणे असे दोन पर्याय त्याच्यासमोर राहिले. अखेर सोमवारी सकाळी बाळू खंदारे सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानुसार पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी त्याला अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलिस आणि बचाव पक्षामध्ये जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी बाळू खंदारे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5iGA2mP
No comments:
Post a Comment