नागपूर: पोलिसांच्या चौकशीनंतर प्रकृती खालावल्याने राहुल पंचम सलामे (वय ३०) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि नागरिकांनी राहुलच्या पार्थिवासह रविवारी सायंकाळी कन्हान पोलीस स्टेशनला घेराव घातला. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने कन्हानमध्ये तणाव निर्माण होऊन महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.३ फेब्रुवारीला कन्हानमधील आंबेडकर चौकातील आठवडी बाजारात हातात शस्त्र घेऊन १२ युवकांनी धुमाकूळ घातला. या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन पळापळ झाली. यात चार महिलांसह ८ जण जखमी झाले होते. युवकांनी परिसरातील वाहनांची तोडफोडही केली. या घटनेने कन्हानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी खैलेश सलामे, शुभम सलामेसह १२ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला. हे दोघेही फरार होते. पोलिसांनी दोघांची माहिती काढण्यासाठी राहुलला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १७ फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत राहुलचे नातेवाईक आणि नागरिकांनी त्याच्या पार्थिवासह रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कन्हान पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आधीच या ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातली. मात्र, कारवाई झाल्याशिवाय हटणार नाही, असं सांगत नातेवाईक आणि नागरिक तेथे तळ ठोकून होते. वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी नातेवाईक आणि नेत्यांची समजूत घातली. त्यानंतर एका तासाने तणाव निवळला. पोलीस बंदोबस्तात राहुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या कन्हानमध्ये तणाव सदृश्यस्थिती आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4wLCgBI
No comments:
Post a Comment