Breaking

Tuesday, February 28, 2023

मार्च ते मेपर्यंत उष्णतेच्या लाटा, मुंबई, कोकण,मराठवाड्यासाठी असा आहे हवामानाचा अंदाज https://ift.tt/pZ3JwYz

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः थंडीने काढता पाय घेण्याआधीच फेब्रुवारीमध्ये कमाल तापमानाचा पारा ३८ आणि ३९ अंशांपर्यंत गेल्यानंतर आता येणारा मे महिना किती तप्त असेल, याची चिंता व्यक्त होत होती. याच काळजीत भर पडणारा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी जारी केला आहे. मार्च ते मे या कालावधीत वायव्य भारताचा काही भाग, मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग येथे सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक असेल. देशाच्या उर्वरित भागात सरासरी किंवा त्याहून कमी कमाल तापमानाची शक्यता आहे.मार्च ते मे या कालावधीचा तसेच मार्च महिन्याचा स्वतंत्र हवामान अंदाज मंगळवारी जारी करण्यात आला. या अंदाजानुसार उत्तर कोकणामध्ये मार्च ते मे या काळात कमाल तापमानाचा पारा चढा राहील, अशी शक्यता आहे. मुंबईचा भाग हा उत्तर कोकणामध्ये येतो. केवळ कमाल तापमानाचाच नाही तर किमान तापमानाचा पाराही या काळात चढा असेल. दक्षिणेकडे काही भागात किमान तापमान सरासरी किंवा त्याहून कमी असू शकते. मात्र इतर भागात सरासरीहून अधिक किमान तापमानाचा ताप होण्याची शक्यता आहे. किमान तापमान पूर्ण कोकण भागात चढे राहील, अशीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीइतके नोंदले जाऊ शकते.मार्च ते मे या काळात उष्णतेच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. मध्य भारत आणि त्या लगतच्या वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो. मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेचा त्रास होण्याची शक्यता कमी असल्याचा सध्याचा अंदाज आहे.मार्चमधील परिस्थितीचा अंदाजमार्च महिन्यामध्ये दक्षिण भारताचा काही भाग वगळता देशभरात कमाल तापमान सरासरीहून अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानही सरासरीहून अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्च २०२३मध्ये देशातील पाऊस सरासरीइतका असेल. वायव्य, मध्य पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारताचा काही भाग येथे उन्हाळ्यात सरासरीहून कमी पाऊस पडेल. पूर्व मध्य, दक्षिण आणि ईशान्य भारतातील तुरळक ठिकाणी सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागात मार्च महिन्यामध्ये कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल. तर किमान तापमान मध्य महाराष्ट्रातील तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीहून चढे असण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WmrCiZa

No comments:

Post a Comment