नाशिक: नाशिक आणि बिबट्या हे समीकरण काही वेगळे नाही. आज सकाळी मांजरीमागे लागलेला बिबट्या आणि जीव वाचवण्यासाठी धावत असलेली मांजर हे दोघे सिन्नर तालुक्यातील तेंबुरवाडी आशापूर येथे विहिरीत जाऊन पडले होते. घटनेची माहिती मिळताच आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मांजर आणि बिबट्या दोघे देखील विहिरीत पाणी जास्त असल्याने जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते.विहिरीत असलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेऊन बिबट्या आपला जीव वाचवून बसल्याचे दिसून आले. तर बिबट्यासोबत विहिरीत पडलेली मांजर देखील विहिरीचा कोपरा शोधून आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. याबाबत तात्काळ वन विभागाच्या माहिती देण्यात आली. त्यांनतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी अथक प्रयत्न करून विहिरीत पडलेला बिबट्या आणि मांजर या दोघांचे प्राण बचावले आहे.विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पिंजऱ्यातून घेऊन जाण्यात आले त्यांनतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यात या अगोदर देखील दोन बिबट्यांनी नारळाच्या झाडावर चढत धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता मांजरी मागे लागलेला बिबट्या विहिरीत कोसळला आहे. तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी देखील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LCT36Pm
No comments:
Post a Comment