: शेंद्रे येथे एका मॉलमध्ये एका व्यक्तीकडून अनवधानाने बंदुकीतून गोळी सुटल्याने एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तीच्या पायाला ही गोळी लागली. त्याऐवजी अन्यत्र गोळी लागली असती तर या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. बंदूक ठेवण्याच्या पॉकेटच्या लेदरचे काम झाल्यानंतर ती व्यक्ती उठून उभा राहत होती. त्यावेळी अचानकच बंदुकीतून गोळी सुटली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.पोलिसांनी सांगितले की, सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील एका मॉलमध्ये आलेल्या ग्राहकाच्या हातातील बंदुकीतून अनावधानाने गोळी सुटली. त्यात कामगाराच्या पायाला ही गोळी लागल्याने तो जखमी झाला. उलफिद युसुफ खान (रा. शेंद्रे) असे जखमी कामगाराचे नाव आहे. शेंद्रे येथील एका मॉलमध्ये अहमदनगरमधील एक व्यक्ती आली होती. बंदुक ठेवण्याच्या पॉकेटच्या लेदरचे काम झाल्यानंतर ही व्यक्ती उठून उभी राहत होती. त्याच वेळी अचानकच बंदुकीतून गोळी ही सुटली. ही गोळी उलफिद याच्या पायाला लागून तो जखमी झाल्यानंतर उलफिद याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधितांकडे बंदुकीचा परवाना असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. परंतु संबंधित व्यक्ती घटनेनंतर मॉलमधून पसार झाली असल्याचे समोर आले आहे. यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही तपासल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या गाडीचा नंबर पोलिसांना दिसून आला आहे. त्यावरून ती व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातारा तालुका पोलीस ठाण्यात सुरू होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/x8Ul6S5
No comments:
Post a Comment