Breaking

Tuesday, March 21, 2023

आशियाई खो-खो स्पर्धा : भारतीय महिलांचा दुसरा विजय, पुरुषांची विजयी सलामी https://ift.tt/Yt6mMF7

गुवाहाटी : चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत पुरुष गटामध्ये साखळी फेरीत यजमान भारताने भूतानवर सहज मात करत विजयी सुरुवात केली. तर महिलांमध्ये यजमान संघाने दुसरा विजय नोंदवत गटात अव्वल कामगिरी केली. महिलांनी पहिल्या लढतीत श्रीलंकेवर दमदार विजय मिळवला होता. पण आता दुसऱ्या लढतीत तर त्यांनी मलेशियावर एक डाव आणि ६४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला आहे.या स्पर्धेत दोन्ही गटात प्रत्येकी चार-चार देशांचे संघ सहभागी झालेले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारताचे दोन्ही संघ तगडे आहेत. पुरुषांच्या गटातील पहिला सामना भारताने सहज जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने भूतानचा ४७-३४ असा १ डाव १३ गुणांनी पराभव केला. प्रथम आक्रमण करत भारतीय संघाने ४७ गुण मिळवले. यामध्ये अनिकेत पोटे (३ गुण), अद्वेत पाटील (३ गुण) यांनी जोरदार आक्रमणाचा खेळ केला. भूतानला दोन्ही डाव मिळून ३४ गुणच मिळवता आले. विजयी संघातर्फे गौतम एम के व अक्षय गणपुले यांचा खेळ चांगला झाला. अन्य सामन्यांमध्ये बांग्लादेशने इंडोनेशियाचा एक डाव ६० गुणांनी (८०-२०) असा पराभव केला. महिला गटात यजमान भारतीय संघाने साखळी सामन्यात दुसरा विजय नोंदवला. यामध्ये मलेशियाला १ डाव ६४ गुणांनी (७९-१५) पराभूत केले. विजयी संघातर्फे गौरी शिंदे (१ मि. संरक्षण आणि ४ गुण), निकिता पवार (१.३० मि. संरक्षण व २ गुण), परवीन निशा (२ मिनीटे संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (६ गुण) यांनी चांगला खेळ केला. मलेशियाकडून नजारा नांदियाने (४ गुण) चांगला खेळ केला. अन्य सामन्यात नेपाळने कोरीयाचा एक डाव २४ गुणांनी (४०-१६) असा पराभव केला. पहिल्या सामन्यातही भारताच्या महिलांनी दणदणीत विजय मिळवला होता. पहिल्या लढतीत भारताने श्रीलंकेला पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण दुसऱ्या सामन्यातही भारताने कामगिरीत सातत्य राखले आणि त्यांनी या स्पर्धेत आपला दुसरा विजय नोंदवला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Sgj3imN

No comments:

Post a Comment