Breaking

Friday, March 31, 2023

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ; टाटा, बेस्टची वीज महागली, आजपासून असे असतील नवे दर https://ift.tt/Z4E3OvH

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विविध दरांमधील बदलाची घोषणा शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरू होती. मुद्रांक, रेडीरेकनर, बचतीवरील व्याजदरांनी नागरिकांना दिलासा दिला असला तरी ‘टाटा’, ‘बेस्ट’च्या विजेचे दर कडाडले आहेत. वीज कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार विजेचे नवे दर आज, शनिवारपासून लागू होत आहेत. मुंबईत वीज वितरण करणाऱ्या ‘टाटा पॉवर’ आणि ‘बेस्ट’च्या दरांत वाढ झाली आहे. तर ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’च्या दरात दिलासादायक घट झाली आहे. रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारच्या महावितरण कंपनीचे नवे दर घोषित झालेले नव्हते.वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती १ एप्रिल २०२० पासून झाली. या पंचवार्षिक वीजदरवाढीचे तिसरे वर्ष संपताना फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीजकंपन्या अंतिम दोन वर्षांसाठी नव्याने वीजदरांसंदर्भात महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करतात. असा प्रस्ताव वीज वितरण कंपन्यांनी जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन नवीन दर शुक्रवारी रात्री उशिरा घोषित करण्यात आले.मुंबईतील साडेसात लाख ग्राहकांना वीज देणाऱ्या ‘टाटा पॉवर’ कंपनीने अधिक वीज वापर करणाऱ्या ग्राहकांच्या वीजदरांत आश्चर्यकारकरित्या घट प्रस्तावित केली आहे. मासिक ३०१ ते ५०० युनिट घरगुती वीज वापरकर्त्यांच्या दरांत ६४ पैसे तर ५०० हून अधिक युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या दरात तब्बल ८९ पैसे प्रतियुनिटची घट केली आहे. त्याचवेळी १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांच्या दरात ६६ पैसे तर १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्यांच्या दरात १६ पैसे प्रतियुनिटची वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान हे वीजदर लागू असणार आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या खिशाला अधिक झळ बसणार आहे.‘टाटा पॉवर’कडून वीज घेऊन ती साडेदहा लाख ग्राहकांना देणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या वीजदरात सरासरी ६० पैसे ते १.२० रुपये प्रतियुनिटची वाढ झाली आहे. कंपनीचे घरगुती ग्राहकांसाठी याआधीचे किमान १.७४ तर कमाल दर ८.७६ रुपये प्रतियुनिट होते. ते आता १.९५ ते १०.८६ रुपये प्रतियुनिट असतील.मुंबईत सर्वाधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड’च्या (एईएमएल) वीजदरात सरासरी दीड ते दोन रुपयांची घट झाली आहे. कंपनीचे घरगुती ग्राहकांसाठी किमान दर ३.४५ रुपये प्रतियुनिट तर कमाल दर ८.५५ रुपये प्रतियुनिट असतील. हे दर आतापर्यंत ५.१२ ते १०.८२ रुपये प्रति युनिटदरम्यान होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qeOZw0C

No comments:

Post a Comment