सातारा : दहावीचा शेवटचा पेपर झाला आणि विवाहिता सुटकेचा निश्वास सोडत असतानाच आपल्या वयाची परीक्षा तिला द्यावी लागली. कोणीतरी कुजबूजलं आणि तिच्या लग्नाची खबर चाइल्ड लाईफ लाईन यांना समजली. ती पोलिसांपर्यंत पोहोचली. ग्रामसेवकाला आदेश येताच ते तातडीने संबंधित विवाहितेच्या माहेरी घरी गेले. त्यावेळी विवाहितेकडे वयाचा पुरावा मागितला तर मुलीचे वय कमी असल्याचे निदर्शनास आले.याबाबत मिळालेली माहिती अशी, विवाहितेच्या लग्नाला पाच महिने होऊन गेली होती. दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने ती गेले महिनाभर आपल्या माहेरी राहत होती. दहावीचा शेवटचा पेपर झाला आणि विवाहितेला आपल्या वयाची परीक्षा द्यावी लागली. कोणीतरी कुजबूजलं त्याची खबर चाइल्ड लाईफ सांगली यांना समजली. ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली. या सर्वांचे फोन ग्रामसेवकांना आले. ग्रामसेवक तातडीने संबंधित विवाहितेच्या माहेरी घरी गेले. तर विवाहिता आपल्या माहेरीच थोरल्या बहिणीबरोबर होती. आई बाहेर गेली होती. त्यावेळी विवाहितेच्या गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा होता. यावेळी ग्रामसेवकांनी आपलं कर्तव्य बजावत सर्व माहिती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे वयाचा पुरावाही मागितला. तिने दहावीचे प्रवेश पत्र ग्रामसेवकांना दिले. ते प्रवेश पत्र पाहिल्यावर त्याच्यात मुलीचे वय कमी असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची कल्पना ग्रामसेवकांनी चाइल्ड लाईन सांगली आणि इस्लामपूर पोलीस ठाण्याला कळवली. विवाहितेचे वय सोळा वर्षे सात महिने असल्याने तिचं कमी वयात लग्न झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली.पोलिसांनी सांगितले की, रोहित पाटील आणि अल्पवयीन विवाहितेचा विवाह कराड तालुक्यातील एका गावात ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पै-पाहुणे नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर गेली पाच महिने यांचा संसार सुखाचा चालू होता. विवाहिता दहावीत असल्याने ती आपल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील माहेरगावी आली होती. दहावीची परीक्षा निर्वीघ्नपणे पार पडली, पण परीक्षेच्या अखेरच्या पेपरच्या दिवशी तिच्या वयाविषयी कुजबूज झाली आणि अल्पवयात लग्न झाल्याचं तिचं बिंग फुटलं. विवाहितेचा अल्पवयात लग्न केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार तिचा पती रोहित पाटील (वय २२), विवाहितेची सासू, सासरे व लग्न लावणारे पुरोहित आणि विवाहितेची आई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्या गावचे ग्रामसेवक सोमनाथ जयवंत मेटकरी यांनी कायदेशीर सरकारतर्फे इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबतची माहिती इस्लामपूर पोलीस ठाण्याने घेऊन हा गुन्हा कराड तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करून बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/i3UjxVb
No comments:
Post a Comment