Breaking

Friday, April 28, 2023

महावितरणने पकडली ३.५ कोटींची वीजचोरी; एकूण ३८३ प्रकरणे, सर्वाधिक वीजचोरी 'या' जिल्ह्यात https://ift.tt/blUG5C7

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महावितरणने राज्यभरात भरारी कारवाईद्वारे साडेतीन कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे. यामध्ये एकूण ३८३ प्रकरणांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे नागपूर परिक्षेत्रांतर्गत, तर ११७ चोऱ्या कोकण परिमंडळातील आहेत.सध्या उन्हामुळे राज्यभरात वीजमागणी वाढली आहे. परिणामी चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळेच महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिलदरम्यान तीन दिवसीय विशेष तपासणी मोहीम राबवली. याअंतर्गत वीजचोरीची एकूण ३८३ प्रकरणे उघडकीस आली. यातील सर्वाधिक १२१ प्रकरणे नागपूर परिक्षेत्रांतर्गत होती.कोकण परिक्षेत्राचा आकडा ११७, छत्रपती संभाजीनगरात परिक्षेत्रात ९२, तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. वीजचोऱ्यांप्रकरणी जवळपास तीन कोटी ५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याचे महावितरणने सांगितले.महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) सुमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष मोहिमांचा वेग वाढविला जाणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता विजेचा अधिकृत वापर करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SXVrsn2

No comments:

Post a Comment