सातारा : पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर वडोली भिकेश्वर (ता. कराड) गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ३) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रवी कुमार नारायण लोहारे (वय ४१, रा. पुसेसावळी, ता. खटाव) असं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सिद्धेश्वर रणदिवे असं जखमीचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज-मसूर रस्त्यावर वीटभट्टीतून एक ट्रक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा दुचाकीचालक ट्रकवर आदळला. या अपघातात दुचाकीवरील रवी कुमार लोहारे हा गंभीररीत्या जखमी होऊन ठार झाला. तर सिद्धेश्वर रणदिवे हा जखमी झाला आहे. ट्रकचालक व तेथील नागरिकांनी अपघातानंतर जखमींना उपचारासाठी कराड येथे दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच रवी लोहारे हा मृत झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक फौजदार मुळीक तपास करत आहेत.दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर दुचाकी अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण नसणे, हे या अपघातांमागील मुख्य कारण ठरत आहे. अपघातात मागील आठवड्याभरात पाच ते सहा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तसंच जखमींची संख्याही तेवढीच आहे. काही जखमींवर शासकीय तर काही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/u7EqJ5h
No comments:
Post a Comment