रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचे पुत्र फैजान रखांगे यांना रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आज रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध नेत्यांवर कारवाईचं सत्र सुरू असतानाच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने नगरसेवकपुत्राला अटक केल्याने नगरपंचायतीतील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.दापोली नगरपंचायतीचे माजी कर्मचारी निलंबित लेखापाल दीपक सावंत यांनी नगरपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांना यापूर्वीच पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता याच कथित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या सुपुत्राचाच नंबर लागल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दापोली नगरपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या खात्यावरती दीपक सावंत यांनी जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक फैजान रखांगे यांच्या अटकेसाठी लक्ष ठेवून होते. मात्र फैजान रखांगे गेले काही दिवस भारतात बाहेर गेल्याची चर्चा होती. मात्र ते दापोलीत येताच पथकाकडून दापोली येथून अटक करण्यात आली आहे.दरम्यान, दापोली नगरपंचायत कर्मचारी दीपक सावंत यांनी दापोली येथील काही विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पर्यटन दौऱ्यासाठी बुकिंग केल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे. या सगळ्याचा खर्च हा दीपक सावंत यांच्याच खात्यावरून वर्ग झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून काही बडे मासे पोलिसांच्या रडावर असल्याची चर्चा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xfEwn09
No comments:
Post a Comment