कोल्हापूर: कोल्हापुरातील पन्हाळगडावर आज दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील अडीच वर्षांचा चिमुरडा चारचाकी खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. इंद्रनील अरुण दबडे असं या अडीच वर्षांच्या चिमुरड्याचं नाव असून या घटनेमुळे बालकाच्या परिवारावर आणि पन्हाळगडावर शोककळा पसरली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, खानापूर (ता. भुदरगड) येथे राहणारे अरुण दबडे हे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह जोतिबाच्या दर्शनासह पन्हाळा येथे पर्यटनासाठी आले होते. ज्योतिबा दर्शन झाल्यानंतर ते पन्हाळगडावर आले आणि सज्जाकोटी पाहण्यासाठी निघाले. यावेळी दबडे कुटुंबीय चहा पिण्यासाठी सज्जाकोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तबक उद्यानासमोर थांबले होते. रस्त्याच्या एका बाजूस आई-वडील आणि एका बाजूस आजी आजोबा बसले होते. यावेळी अडीच वर्षाचा इंद्रनील आईचा हात सोडून रस्ता ओलांडत होता. मात्र, याच वेळी समोरून MH45AL6203 या चारचाकी गाडीने इंद्रनीलला जोराची धडक दिली. ही गाडी सुधीर कुमार हांडे राहणार करमाळा हे चालवत होते. गाडीच्या पुढच्या चाकात इंद्रनील अडकला आणि तो गंभीर जखमी झाला होता. हा सर्व थरार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान इंद्रनीलला स्थानिकांच्या मदतीने पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचार होत नसल्याने इंद्रनीलला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करायचे होते. यासाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात असणारी रुग्णवाहिका न्यावी म्हटलं, पण चालक नसल्याने गेली कित्येक दिवस ती बंद आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका बोलावून घेण्यात आली. त्यात एक तासभर वेळ गेला आणि अखेर इंद्रनीलला कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, इंद्रनीलची मृत्यूची झुंज ही अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लाडाच्या इंद्रनील सोडून गेल्याचं कळताच दबडे कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. या घटनेनंतर रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. पन्हाळगडावर अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंग यामुळे घडत असलेल्या अशा अपघातांना वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. आज जर ही रुग्णवाहिका इंद्रनीलसाठी उपलब्ध झाली असती तर बहुदा तो वाचला असता. ग्रामीण रुग्णालयात सर्व सोयी असून देखील व्यवस्थित नियोजन नसल्याने रुग्णाचे हाल होतात. या घटनेमुळे पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर आला असून त्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FSg25Yj
No comments:
Post a Comment