कोलकाता : यंदाच्या आयपीएल मोसमात झालेल्या बहुतांश सामन्यांप्रमाणेच आज झालेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद हा सामनाही अटीतटीचा ठरला. या सामन्यात हैदराबादने केकेआरवर २३ धावांनी विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरकडून कर्णधार नितेश राणा आणि रिंकू सिंहने आक्रमक अर्धशतके झळकावली. मात्र केकेआरला २० षटकांअखेर २०५ धावाच करता आल्या. केकेआरचा कर्णधार नितेश राणा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर हॅरी ब्रुकने सुरुवातीपासून केकेआरच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं आणि ५५ चेंडूंत शतक ठोकलं. कर्णधार एडन मार्करम यानेही २६ चेंडूंत ५० धावा फटकावल्या. या दोन वादळी खेळींच्या जोरावर हैदराबादने केकेआरसमोर २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं.हैदराबादने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र नंतर कर्णधार नितेश राणे याने आक्रमक फलंदाजी करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या. तसंच दुसऱ्या बाजूने रिंकू सिंहनेही हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. नितेश राणा याने ४१ चेंडूंत ७५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतरही रिंकू सिंह अखेरपर्यंत मैदानात राहिला. मात्र दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स जात राहिल्याने संघाला विजयापर्यंत नेण्यात रिंकूला अपयश आलं. रिंकूने ३१ चेंडूंत केलेली ५८ धावांची खेळी व्यर्थ गेली.दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांत पराभवाची नामुष्की सहन कराव्या लागलेल्या हैदराबादने सलग दुसऱ्या सामन्यात विजय साकारत स्कोरबोर्डमध्येही मुसंडी मारली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9JMmtDX
No comments:
Post a Comment