सातारा : तालुक्यातील शिरगाव येथील विवाहित तरुणीचा नवी मुंबईत संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने शिरगाव येथे खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील खोलीत गुरुवारी रात्री उशिरा नीलम हिचा संशयास्पद मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाला नसून पतीसह सासरच्या मंडळीनी खून केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींकडून करण्यात आला आहे. शिरगाव येथे शोकाकूल वातावरणात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, पतीसह तिच्या सासरच्या मंडळींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत नीलम हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील शिरगाव येथील निलम हिचा विवाह खानापूरच्या वैभव जाधव याच्याशी दोन वर्षापूर्वी झाला होता. विवाह झाल्यापासून सतत कुरबुरी व त्रास देण्याचा प्रकार तिच्या सासरच्या मंडळीकडून होत होता. सासरे शांताराम हे मुलूंड परिसरात खाजगी सावकारीचा व्यवसाय करतात, तर पती वैभव हा खाजगी क्लासेस मुलुंड येथे चालवतो. लग्न झाल्यानंतर नीलम हिला त्यांनी कोपरखैरणे येथील खोलीवर नांदवण्यास नेले. तेथे नेल्यानंतर तिला तुच्छतेची वागणूक देण्यास सुरुवात केली. माहेरच्या नातेवाईकांशी बोलण्यास सुद्धा दिले जात नव्हते. नीलम आणि तिचा पती वैभव यांच्या दौघांमध्ये गत एक आठवड्यापूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर ते गावीही आले होते. गावी आल्यानंतर त्यांनी देवदर्शन करून पुन्हा ते दोघे खोलीवर परत गेले. गुरुवारी रात्री वैभव यानेच शिरगावला फोन करून नीलमबाबत सांगितले. तेव्हा शिरगाव येथून नातेवाईक जावून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कौपखैरणे येथे पोहचले. खोलीत वरचा पत्रा उचकटून आतमध्ये उतरले. तेव्हा नीलम ही ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. कोपरखैरणे पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला. दरम्यान, नीलम हिचा मृतदेह शिरगावला आणण्यात आला. शिरगाव येथे शोकाकुल वातावरणात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हा नीलमच्या घातपाताचा प्रकार असून सुस्वभावी असलेली नीलम आत्महत्या करू शकणार नाही. तिला पती वैभव, सासरा शांताराम, सासू सुवर्णा आणि नणंद वर्षा हे सतत मारहाण करत त्रास देत होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिरगाव येथील भोसले परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VANMxDG
No comments:
Post a Comment