जालना : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागढ गावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत वाद घातल्यानंतर रागाच्या भरात बापाने पोटच्या दोन्ही मुलींना पाजले होते. यात एकीचा पाच दिवसांपूर्वी तर दुसरीचा आज मंगळवारी दि.१६ रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या प्रकरणात निर्दयी बापावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या कारागृहात आहे. शिवाज्ञा कृष्णा पंडित असे आज मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.कृष्णा पंडित (वय ३१, रा.शहागड,ता.अंबड जि.जालना) हे संगणक दुरूस्तीचा व्यवसाय करतात. तर त्यांची पत्नी मनीषा या खासगी बँकेत लिपीक आहेत. त्यांना ७ वर्षांची श्रेया तर दीड वर्षाची शिवाज्ञा अशा दोन मुली आहेत. ८ मे रोजी कृष्णा व मनीषा यांच्यात टोकाचे भांडण झाले. नेहमीच्याच भांडणाला मनीषा वैतागल्याच होत्या. त्यामुळे त्यांनी लगेच बॅग भरली आणि दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघाल्या होत्या. पण रागाने बेफाम झालेल्या कृष्णाने मनीषाच्या डोक्यात वीट फेकून मारली होती. जखमी मनीषा दोन्ही मुलींना कृष्णाकडेच सोडून दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. उपचारानंतर त्यांनी त्या दिवशीचा मुक्काम मावस भावाकडे केला. मंगळवारी सकाळी दहा वाजता कृष्णा हा दोन्ही मुलींना घेऊन पत्नीकडे गेला. मनीषा यांना घरी चल, नाही तर मी मुलींना मारून टाकीन अशी धमकी पण दिली. भांडण झालेले असल्याने मनीषा यांनी जाण्यास नकार दिला. त्यानंतर कृष्णा घराबाहेर गेला. त्याने श्रेया व शिवाज्ञा या दोन्ही मुलींना उंदिर मारायचे विषारी द्रव पाजले, नंतर त्याने स्वतः देखील विष प्राशन केले. यात सर्वचजण बेशुद्ध पडले. त्यामुळे नातेवाइकांनी तत्काळ त्यांना सुरुवातीला गेवराई व नंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १० मे रोजी कृष्णा याची तब्येत बरी झाली. परंतु, मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. ११ मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास श्रेयाची तर आज १६ मे रोजी सकाळी शिवाज्ञाची प्राणज्योत मालवली. नवरा बायकोच्या वादात निष्पाप दोन मुलींचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/o4blJ8Q
No comments:
Post a Comment