म. टा. प्रतिनिधी, मुंबई : 'ईडीच्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. त्यांच्याकडे कुठलेही प्रश्न शिल्लक राहिले असतील, असे वाटत नाही,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी सोमवारी ईडीच्या साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर दिली. सकाळपासून उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे पाटील यांनी आभार मानले.'चौकशीला सामोरे जाताना माझ्याकडे एक पुस्तक होते. ते निम्मे वाचून झाले,' असेही ते म्हणाले. पुढील समन्स कधी, असा प्रश्न विचारता त्याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. 'माझे कर्तव्य मी पार पाडले. मी कायदा पाळणारा नागरिक आहे. प्रश्न विचारणाऱ्या ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी चांगली वागणूक दिली. जवाब नोंदविण्याच्या कामास टायपिंग करण्यासाठी अधिक वेळ लागला म्हणून तुम्हाला बराच वेळ बसावे लागले,' असेही जयंत पाटील यांनी समर्थकांना सांगितले. 'तुमच्या आशीर्वादाने मी कधीही चुकीचे काम केले नाही. राज्यात ३१६ तालुक्यांत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. त्या सर्वांचे अभिनंदन करतो. हा विश्वास आपण राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या पाठिशी कायम दाखवाल,' असे पाटील यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी साडेनऊ तास ईडी चौकशीला सामोरे गेले. त्यांच्या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुंबई राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. सकाळपासून राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बहुसंख्य कार्यकर्ते सांगलीतील इस्लामपुरातून आले होते. अनेकांच्या हातात 'हवालदारांचा नेता टरबुजा' असे फलक होते. ईडी कार्यालय हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ आहे. त्यामुळे ईडी कार्यालयाभोवती पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.जयंत पाटील दुपारी १२ वाजता पक्ष कार्यालयात आले. तेथे त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. नंतर ते पायी ईडी कार्यालयात गेले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. 'विरोधी पक्षात असल्याची मी किंमत चुकवत आहे. माझा आयएल अँड एफएसशी काही संबंध नाही. यासंदर्भातील आरोपपत्र २०१६मध्ये दाखल झाले आहे,' असा दावा त्यांनी केला. सन २००८ ते २०१४ या कालावधीत रस्ते उभारणीचे कंत्राट आयएल अँड एफएस कंपनीला देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून उपकंत्राटदारांना कामे दिली होती. उपकंत्राटदाराने जयंत पाटील यांच्या निकटच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा केल्याचा ईडीचा आरोप आहे. ज्यावेळी हे पैसे देण्यात आले, त्यावेळी जयंत पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते.राज्यभर निदर्शनेराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आदी राष्ट्रवादीच्या १० नेत्यांना ईडीच्या नोटिसा व चौकशीचा सामना करावा लागला आहे. राज्यभरात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक निदर्शने करून भाजप आणि ईडीच्या विरोधात घोषणा दिल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/u34f5WK
No comments:
Post a Comment