अहमदाबाद : गतविजेत्या गुजरात टायटन्सने या वर्षीही विजयाचा धडाका कायम ठेवला आणि प्ले ऑफमध्ये प्रथम पोहोचण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. या विजयासह गुजरातच्या संघाचे आता १८ गुण झाले आहेत आणि प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातच्या संघाने १८८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची बिकट अवस्था झाली आणि ते हा सामना गामावणार हे स्पष्ट दिसत होते. गुजरातने या सामन्यात हैदराबादवर ३४ धावांनी दमदार विजय साकारला.गिलचा झंझावात या सामन्यात पाहायला मिळाला. पण त्याचबरोबर हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने पाच विकेट्स मिळवत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. भुवीने पाच विकेट्स हे अखेरच्या षटकांत पूर्ण केले. पण त्यापूर्वी गिलचे वादळ मैदानात आले होते. गिलने या सामन्याच्या सुरुवातीासून तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे गिल या सामन्यात मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पहिल्या पॉवर प्लेचा चांगलाच फायदा यावेळी गिलने घेतला. पॉवर प्लेमध्ये गिलने हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि या गोष्टीचा त्याला फायदा झाला. गिलने दमदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर गिलने फलंदाजीचा गिअर बदलला. गिलने त्याने आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली आणि तो शतकासमीप पोहोचला. गिलने यावेळी ५६ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्यामुळेच गुजरातच्या संघाला यावेळी १८८ धावा करता आल्या. गिलला यावेळी साई सुदर्शनने ४७ धावा करत गिलला चांगली साथ दिली. भुवीने यावेळी चार षटकांत ३० धावा देत पाच बळी मिळवले. गिलसारख्या शतकवीरालाही त्यानेच बाद केले. पण भुवीचा हा पराक्रम हैदराबादच्या विजयात परावर्तित होऊ शकला नाही. गुजरातच्या १८९ धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादची सुरुवात दयनीय झाली होती. कारण त्यांनी आपले सहा फलंदाज ४९ धावांंमध्येच गमावले होते. त्यानंतर हेन्रिच क्लासिनने धडाकेबाज फलंदाजी करत संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण तो ६४ धावांवर बाद झाला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9PwVLtm
No comments:
Post a Comment