Breaking

Sunday, May 14, 2023

IPL 2023 : राजस्थानचा हिशोब चेन्नईकडून वसूल, नितीश राणानं करुन दाखवलं, केकेआरचा सीएसकेवर दणदणीत विजय https://ift.tt/IlHnwaN

चेन्नई : केकेआरच्या संघाला राजस्थानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानं आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. राजस्थानच्या यशस्वी जैस्वालच्या वादळी खेळीमुळं केकेआर प्लेऑफच्या रेसच्या बाहेर पडतेय की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. यशस्वी जैस्वालनं केकेआरचा कॅप्टन नितीश राणाच्या पहिल्या ओव्हरमध्येच वादळी खेळीला सुरुवात केली होती. आयपीएलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वीच्या नावावर जमा झाला होता. हा विक्रम नितीश राणाच्या गोलंदाजीवर झाल्यानं त्याच्यासाठी देखील ती चांगली गोष्ट नव्हती. राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर केकेआरनं चेन्नईला त्यांच्या मैदानावर पराभूत केलं आहे. केकेआरच्या या विजयात कर्णधार म्हणून नितीश राणाची कामगिरी महत्त्वाची आहे.चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना १४४ धावा केल्या होत्या. १४५ धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीची फळी दीपक चहरच्या बॉलिंगवर तंबूत परतली होती. केकेआरची अवस्था ३ बाद ३३ धावा इतकी बिकट झाली होती. यावेळी मैदानात आलेल्या नितीश राणानं सगळी सूत्रं स्वत: कडे घेत राजस्थान विरुद्धच्या पराभवाचा डाग धुवून काढला. नितीश राणानं नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला.

नितीश राणा रिंकू सिंगची भागिदारी महत्त्वाची

नितीश राणा आणि रिंकू सिंग हे दोघे मैदानात होते त्यावेळी केकेआर नाजूक स्थितीत होतं. केकेआरच्या ३ बाद ३३ धावा होत्या. दोघांनी टीमसाठी अर्धशतक झळकवलं आणि विजयाचा मार्ग सोपा केला. रिंकू सिंगनं तीन षटकार आणि चार चौकारांसह वादळी ५४ धावा केल्या. रिंकू सिंग पुढे धावबाद झाला. पण नितीश राणा मैदानावर तळ ठोकून होता. नितीश राणानं १ षटकार आणि ६ चौकारांसह संयमी खेळी करत ५७ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. नितीश राणा आणि रिंकू सिंगनं केलेल्या ९९ धावांच्या भागिदारीमुळं केकेआरनं चेन्नईला पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा आशा कायम ठेवल्या. दरम्यान, केकेआरनं विजय मिळवल्यामुळं त्यांच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. गुणतालिकेत गुजरात पहिल्या स्थानावर कायम आहे, चेन्नई दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या तर लखनऊ चौथ्या क्रमांकावर आहे. केकेआर १३ गुणांसह सातव्या स्थानावर आहे त्यांच्या देखील प्लेऑफच्या आशा कायम आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/m5TEHDa

No comments:

Post a Comment